बारपेटा/गुवाहाटी (आसाम) : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला असून, राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीनंतर अटक केली जाईल, असा इशारा सरमा यांनी दिला आहे, तर शक्य तेवढे गुन्हे दाखल करा, घाबरणार नाही, असे आव्हान राहुल गांधी यांनी सरमा यांना दिले आहे. ‘शक्य तेवढे गुन्हे दाखल करा, त्याला घाबरणार नाही,’ असे आव्हान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी भाजपशासित राज्य सरकारला दिले.
‘मला कळत नाही की, हिमंता बिस्वा सरमा यांना माझ्यावर गुन्हे दाखल करून मला धमकावता येईल, अशी कल्पना कशी आली? तुम्ही जितके खटले दाखल करू शकता, तितके दाखल करा. आणखी २५ खटले दाखल करा, मी घाबरणार नाही. भाजप-आरएसएस मला धमकावू शकत नाही,’ असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, सुरक्षेच्या समस्यांबद्दल गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी केली.
‘रोड शो’ला प्रचंडी गर्दीशहराच्या मुख्य रस्त्यांवरून हळूहळू फिरणाऱ्या वाहनाच्या छतावर बसून राहुल गांधी नागरिकांना अभिवादन करत होते. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. गांधींनी त्यांच्या वाहनावरील सहभागींच्या मुलांशी संवाद साधला.