मागील शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. यामुळे देशभरात काँग्रेसने निदर्शने केली. काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान, आज निवडणूक आयोगाने कार्नाटक विधानसेभेच्या निवडणुकीची घोषणा केली. आता या निवडणुकीसाठी राहुल गांधी मैदानात उतरणार आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी गांधी यांनी वक्तव्य करुन खासदारकी रद्द झाली त्याच ठिकाणापासून आता राहुल गांधी कर्नाटक निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.
माजी खासदार राहुल गांधी यांची पहिली सभा अनेक अर्थांनी खास असणार आहे. गांधी ५ एप्रिलला कोलारमध्ये रॅली काढणार आहेत. कोलार हे तेच ठिकाण आहे जिथे राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावर टिप्पणी केली होती. या टिप्पणीमुळेच त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. "राहुल गांधी कोलारमध्ये 'सत्यमेव जयते रॅली'ला सुरुवात करतील. आम्ही त्यांना विनंती केली आहे की, त्यांनी ते विधान जिथं केले तेथूनच त्यांचा निवडणूक प्रवास सुरू करावा. ते कोलार येथून त्यांच्या प्रचाराची सुरुवात करतील, अशी माहिती कर्नाटक पक्षाचे प्रमुख डीके शिवकुमार यांनी दिली.
घरबसल्या मतदान करता येणार! कर्नाटक निवडणुकीपासून होणार सुरुवात, जाणून घ्या नेमकी प्रक्रिया काय?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींनी कर्नाटकातील कोलारमध्ये रॅली घेतली होती, यामध्ये त्यांनी मोदी सरकारवर भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप केला होता. सर्व चोरांचे आडनाव मोदी असल्याचे राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. त्यांच्या वक्तव्याला भाजपने इतर मागासवर्गीयांचा अपमान म्हणून आरोप केला होता आणि गुजरातमधील पक्षाचे नेते पूर्णेश मोदी यांनी खटला दाखल केला होता.
राहुल गांधींनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला आहे. त्यानंतर, न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि शुक्रवारी त्यांना लोकसभेसाठी अपात्र ठरवण्यात आले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. १८ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली.
आज कर्नाटकातील विधानसभा निवडणूक जाहीर
आज कर्नाटकातील विधानसभा निवडणूक जाहीर झाली. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन तारखा जाहीर केल्या. कर्नाटकातील सर्व २२४ विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात १० मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर १३ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.