Rahul Gandhi America: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील मोठा विजय मिळवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी 10 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. राहुल गांधी 31 मे रोजी अमेरिकेत पोहोचतील आणि 4 जून रोजी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर येथे 5000 भारतीयांच्या एका रॅलीला संबोधित करतील. याशिवाय, इतर अनेक कार्यक्रमांमध्येही ते सहभागी होणार आहेत. राहुल गांधींचा हा दौरा चर्चेत आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जूनला अमेरिकेला जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचाअमेरिका दौरा असल्यामुळे राहुल गांधींच्यांच्या दौऱ्यालाही मोठे महत्व आले आहे. पंतप्रधान मोदींना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून भेटीचे निमंत्रण मिळाले आहे. अमेरिकेत पंतप्रधान मोदी व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित राहणार आहेत. तर, 10 दिवसांच्या दौऱ्यात राहुल वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्नियालाही जाणार आहेत. तिथे ते पॅनल चर्चेत सहभागी होतील, त्यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठात भाषण देतील. याशिवाय ते राजकारणी आणि उद्योजकांनाही भेटणार आहेत.
इंग्लंड दौऱ्यावर झालेल्या गदारोळानंतर राहुल गांधींचा हा दुसरा मोठा दौरा असेल. इंग्लंड दौऱ्यात लंडनमधील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत विरोधी पक्षांच्या नेत्यांवर हेरगिरी केल्याचा गंभीर आरोप केला होता. यासोबतच भारताच्या लोकशाहीवर हल्ला होत असल्याचेही ते म्हणाले होते.
राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर देशाच्या संसदेत चांगलाच गदारोळ झाला. केंद्रातील सत्ताधारी पक्षाने राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. गदारोळामुळे संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले, मात्र राहुल गांधी आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले. राहुल यांच्या वक्तव्यावर काँग्रेस पक्षाने असे म्हटले होते की, त्यांच्या नेत्याने जे काही सांगितले, त्यात काहीही चुकीचे नाही. माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही.