नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे २ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. याठिकाणी भोले बाबांच्या सत्संगाला अनेक राज्यांतून महिला आणि पुरुषांनी हजेरी लावली होती. यादरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली, त्यात लहान मुलांसह १२१ जणांना जीव गमवावा लागला. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हाथरसला भेट देणार आहेत.
चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची राहुल गांधी भेट घेणार आहेत. यासंदर्भातील माहिती काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिली आहे. केसी वेणुगोपाल म्हणाले, "हाथरसची घटना दुःखद आहे. राहुल गांधी लवकरच हाथरस येथे जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत."
या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भोले बाबा फरार आहेत. दुसरीकडे, उत्तर प्रदेश पोलिसांनी भोले बाबांच्या सेवा कर्मचाऱ्यांना अटक करण्यासाठी कारवाई तीव्र केली आहे. पोलिसांनी सेवा कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यासाठी हाथरस, एटा, कासगंज, मैनपुरी, इटावा, फर्रुखाबाद, मथुरा, आग्रा आणि मेरठसह डझनहून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत.
पोलिसांनी आतापर्यंत ३० हून अधिक सेवा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही बुधवारी घटनास्थळी भेट दिली. तसेच, या घटनेला जो कोणी जबाबदार असेल, त्याला कठोर शिक्षा केली जाईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
योगी सरकार SOP जारी करणारभविष्यात अशा घटना टाळण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या मेळाव्यास परवानगी देण्यासाठी एसओपींवर काम सुरू केले आहे, असे उत्तर प्रदेशचे मंत्री असीम अरुण यांनी बुधवारी सांगितले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना एसओपी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत आणि जेव्हा सुविधांसाठी मूलभूत, किमान अटी पूर्ण केल्या जातील तेव्हाच कार्यक्रमांना परवानगी दिली जाईल.