राहुल गांधी यांनी विजय दर्डा यांना जे सांगितले, ते करून दाखविले!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 01:21 AM2019-03-28T01:21:47+5:302019-03-28T01:25:25+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जे सांगितले ते करूनही दाखविले आहे. लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आणि माजी खासदार विजय दर्डा यांच्या प्रस्तावावर राहुल गांधी यांनी जे पत्र पाठविले होते, त्याची घोषणा केल्यावरून हेच सिद्ध होते.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जे सांगितले ते करूनही दाखविले आहे. लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आणि माजी खासदार विजय दर्डा यांच्या प्रस्तावावर राहुल गांधी यांनी जे पत्र पाठविले होते, त्याची घोषणा केल्यावरून हेच सिद्ध होते.
माजी खासदार विजय दर्डा यांनी अलीकडेच राहुल गांधी यांना एक पत्र लिहून काँग्रेस शासित राज्यांत बेरोजगार, शेतकरी आणि देशातील गरिबांना किमान उत्पन्न देण्याची तरतूद करण्याची सूचना केली होती. विजय दर्डा यांनी आपल्या पत्रासोबत काँग्रेस शासित राज्यांतील सुशिक्षित बेरोजगार आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या आणि त्यांना किमान उत्पन्नाच्या हमीसाठी आवश्यक निधीची आकडेवारीही दिली होती. याबाबत लवकरात लवकर घोषणा होणे आवश्यक आहे, कारण मोदी सरकार अशाच स्वरूपाची घोषणा करण्यावर विचार करीत आहे, असेही दर्डा यांनी पत्रात नमूद केले होते.
माजी खासदार विजय दर्डा यांच्या या पत्राची राहुल गांधी यांनी दखल घेऊन त्यांना तातडीने उत्त्तर पाठविले. त्यात राहुल यांनी म्हटले होते की, ‘बेरोजगार, अल्पभूधारक शेतकरी व गरिबांना किमान उत्पन्न मिळावे यासाठी आपण केलेली सूचना काँग्रेस निवडणूक जाहीरनामा समितीकडे पाठविण्यात आली आहे.’
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, माजी खासदार दर्डा यांच्या घोषणेवर राहुल गांधी यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि अर्थतज्ज्ञांशी गंभीर चर्चा केली. त्यानंतर छत्त्तीसगढमधील एका निवडणूक सभेत त्यांनी याबाबत पहिल्यांदा घोषणाही केली. राहुल गांधी यांनी घोषणा केली तेव्हा योजनेची ब्ल्यूप्रिंट तयार झालेली नव्हती. त्यामुळे योजनेची विस्तृत माहिती सार्वजनिक होऊ शकली नव्हती.
या आठवड्यात राहुल गांधी यांनी वार्षिक उत्पन्न १२ हजारांपेक्षा कमी असलेल्या सर्वच गरिबांना दरमहा किमान ६ हजार रुपये उत्पन्नाची हमी देण्याची घोषणा केली. या योजनेचा लाभ शेतकरी असो वा विद्यार्थी अथवा व्यावसायिक सर्वच गरिबांना होणार आहे.
आपल्या प्रस्तावावर राहुल गांधी यांनी तातडीने कार्यवाही केल्याबद्दल माजी खासदार दर्डा यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, आपल्या सूचनेचा पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्याचे जे वचन राहुल गांधी यांनी पत्राद्वारे दिले होते, ते पूर्णही केले आहे.