- हरिश गुप्ता नवी दिल्ली : काँग्रेसच्या प्रमुखपदाची सूत्रे राहुल गांधी यांनी पुन्हा हाती घ्यावीत यासाठी सोनिया गांधी यांनी नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत.राहुल गांधी आता सक्रिय झाले आहेत. ते नेत्यांच्या पुन्हा बैठका घेत आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी बोलावलेल्या चहापान कार्यक्रमालाही ते हजर राहिले. दिल्लीत रामलीला मैदानावर शनिवारी होणाऱ्या काँग्रेसच्या मेळाव्यात भाषण करण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे.
महाराष्ट्रात विरोधी पक्षांचे सरकार स्थापन झाल्यामुळे आलेला उत्साह, मरगळलेली अर्थव्यवस्था आणि नागरिकत्व कायद्याविषयीचा असंतोष या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी हा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला. राहुलजींनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती नेते मंडळी तिथे करणार असल्याचे वृत्त आहे.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह पक्षाच्या अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना जाहीरपणे राजीनामा मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष या नात्याने हरयाणा आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांत काँग्रेसचा आलेख वर नेला आहे. परंतु, त्यांनाप्रकृतीच्या कारणांसह इतर कारणांनी त्या जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे. या पार्श्वभूमीवर, आता राहुल गांधी यांच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे
मन वळविण्याचे प्रयत्न सुरु
राहुल यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी मन वळवण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला होता. पण त्यांनी आपली भूमिका बदलली नव्हती. त्यांचा राजीनामा कार्यकारिणी समितीने कधीही स्वीकारला नाही ही बाब वेगळी. त्यांचा राजीनामा अजूनही प्रलंबित आहे. राहुल गांधी यांच्या गैरहजेरीत सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष पदाची जबाबदारी घेतलेली आहे.