"मी साधा माणूस, मला देवाकडून कुठलाही आदेश येत नाही"; राहुल गांधींचा पंतप्रधानांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 05:46 PM2024-06-12T17:46:49+5:302024-06-12T17:48:56+5:30
Rahul Gandhi trolls PM Narendra Modi: पंतप्रधान मोदी यांनी एका मुलाखतीत या संदर्भात वक्तव्य केले होते
Rahul Gandhi trolls PM Narendra Modi: केरळच्या वायनाडमधून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर राहुल गांधी आज पहिल्यांदाच तेथे पोहोचले. तिथे ते म्हणाले की, वायनाड आणि रायबरेलीची जागा जिंकल्यानंतर आता कोणत्या मतदारसंघातून खासदारकी कायम ठेवायची आणि कोणत्या जागेवरून सोडायची या संभ्रमात राहुल गांधी आहेत. वायनाडच्या जनतेचे आभार व्यक्त करताना राहुल यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.
मलप्पुरममधील एका जाहीर सभेत राहुल गांधी म्हणाले, "मी जो काही निर्णय घेईन त्यामुळे दोन्ही मतदारसंघातील जनतेला आनंद होईल असा मला विश्वास आहे. मला आशा आहे की लवकरच आपली भेट होईल. मी वायनाडचा खासदार राहायचे की रायबरेलीचे, या संभ्रमात आहे. पण मला कुठलेही इश्वरी संकेत मिळत नाहीत. पंतप्रधानांना मात्र तसे काहीसे करता येते. देवानेच पंतप्रधानांना देशातील प्रमुख विमानतळे आणि वीज प्रकल्प अदानींकडे सोपवण्याचे निर्देश दिले," असा टोमणा राहुल गांधींनी मारला.
"मी माणूस आहे. माझा देव देशाची गरीब जनता आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे सोपे आहे. मी फक्त लोकांशी बोलतो, त्यांच्याशी संवाद साधतो आणि ते मला सांगतात की मी काय केले पाहिजे. लोकसभा निवडणुकीचा लढा भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी होता आणि त्या लढ्यात द्वेषाचा प्रेमाने, अहंकाराचा नम्रतेने पराभव झाल्याचे दिसले. भारतातील जनतेने स्पष्ट संदेश दिल्याने आता तरी पंतप्रधान मोदींना आपला दृष्टिकोन बदलावा. नवे सरकार हे दुसऱ्याच्या आधारावर चालत असलेले 'पंगू सरकार' आहे," अशी टीकाही राहुल गांधींनी केली.
दरम्यान, केपीसीसी प्रमुख के. सुधाकरन यांनी राहुल गांधींना वायनाड लोकसभा जागा सोडण्याचे संकेत दिले.