Rahul Gandhi:काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मानहानीच्या खटल्यातील शिक्षेविरोधात अपील दाखल केल्यानंतर सोमवारी सुरत सत्रन्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आज राहुल गांधी स्वत: सुरत येथील सत्र न्यायालयात उपस्थित होते. मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला आव्हान देण्यासाठी ते आले होते. या प्रकरणी त्यांनी शिक्षा सुनावल्यानंतर 11 दिवसांनी त्यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली.
यावेळी राहुल गांधींसोबत प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे अनेक दिग्गज नेतेही उपस्थित होते. राहुल यांना 13 एप्रिलपर्यंत जामीन मिळाला आहे, तर पुढील सुनावणीची तारीख 3 मे निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केले. "ही ‘मित्रकाल’विरोधात, लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. या संघर्षात सत्य हेच माझे शस्त्र आहे आणि सत्य हेच माझा आधार आहे,'' असे ट्विट राहुल गांधी यांनी केले.
यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी राहुल गांधींचे ट्विट रिट्विट केले आणि लिहिले, "योद्धे विचलित होत नाहीत, एका क्षणासाठीही धीर सोडत नाहीत, अडथळ्यांना मिठी मारतात अन् काट्यांमधून मार्ग काढतात." दरम्यान, 2019 मध्ये कर्नाटकातील सभेत मोदी आडनावावर केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधींवर कारवाई झाली आहे.