नवी दिल्ली-
सरकार निराश झालेलं नाही. आम्ही एक पाऊल मागे हटलो आहोत. पण दोन पावलं पुढे जाऊ, असं सांगत तिन्ही कृषी कायदे भविष्यात परत येऊ शकतात असे संकेत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले. त्यावर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. कृषी कायदे परत आणण्याच्या दिशेनं सरकारनं पावलं टाकली तर देशाचा अन्नदाता पुन्हा एकदा सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब करेल आणि याआधी देखील अहंकाराचा पराभव झाला आहे. पुन्हा पराभूत करू, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
शेतकरी व शेतीक्षेत्राच्या विकासासाठी स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने कृषी कायदे आणले होते. केंद्र सरकारला नाइलाजाने ते मागे घ्यावे लागले; परंतु 'सरकार निराश नाही. आम्ही एक पाऊल मागे हटलो आहोत. पुन्हा दोन पावले पुढे जाऊ' असे सांगून ते तिन्ही कृषी कायदे भविष्यात परत येऊ शकतात, असे संकेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले होते. अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. तोमर यांच्या याच विधानाचा राहुल गांधी यांनी समाचार घेतला आहे.
"देशाच्या कृषीमंत्र्यांनी मोदींनी मागितलेल्या माफीचा अपमान केला असून हे अतिशय निंदनीय आहे. जर कृषी कायद्यांबाबत पुन्हा एकदा सरकारनं पावलं पुढे टाकण्याचा प्रयत्न केला तर अन्नदाता सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब करेल. याआधी देखील अहंकाराचा पराभव झाला होता आणि आम्ही पुन्हा एकदा पराभूत करू", असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.