नवी दिल्ली-
महगाई, पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावरुन वारंवार मोदी सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज जीएसटीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारनं आपल्या कार्यकाळात आतापर्यंत वस्तू आणि सेवा कर (GST) तब्बल १४० टक्क्यांनी वाढवल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला केला आहे. यासंदर्भातीएल एक ट्विट त्यांनी केलं असून त्यात एका वृत्ताचाही दाखला दिला आहे.
'जीएसटीमध्ये केला १४० टक्क्यांचा विकास, सुरू आहे अच्छे दिनचा पर्दाफाश', असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारनं कपड्यांवर १२ टक्के जीएसटी आकारण्याच्या घेतलेल्या निर्णयाची बातमी ट्विट केली आहे. रेडिमेड कपड्यांवरील जीएसटीमध्ये वाढ केल्यानं व्यापारी नाराज असून आंदोलनाचा इशारा दिला आहे अशी एक बातमी राहुल गांधी यांनी ट्विट केली आहे. जीएसटीच्या नावाखाली देशातील सर्वसामान्य जनतेची लूटमार सुरू असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
कपडे आणि फुटवेअर महागणारकेंद्र सरकारकडून येत्या नव्या वर्षात काही वस्तूंवर वस्तू व सेवा कर (GST) वाढविण्याचा निर्णय लागू केला जाणार आहे. यात रेडीमेड कपडे, फुटवेअर यांचाही समावेश आहे. रेडीमेड कपडे आणि फुटवेअरवर याआधी ५ टक्के जीएसटी आकारला जात होता. पण नव्या वर्षात म्हणजेच जानेवारी २०२२ पासून १२ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. त्यामुळे येत्या वर्षात कपडे आणि फुटवेअरच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. जानेवारी २०२२ पासून नवे नियम लागू केले जाणार आहेत.
रेडीमेड कपडे आणि फुटवेअरवरच्या जीएसटीमध्ये वाढ होणार असल्याची चर्चा याआधी पासूनच होती. जीएसटीमध्ये वाढ करण्याची अधिसूचना केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) १८ नोव्हेंबरमध्येच जारी केली होती.