नवी दिल्ली - नव्या कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी आंदोलन आज 35व्या दिवशीही सुरूच आहे. तीनही कायदे रद्द करण्यात यावे, या मागणीवर शेतरी आंदोलक अडून बसले आहेत. यातच राहुल गांधींनी आपल्या एका ट्विटच्या माध्यमाने पंतप्रधान मोदींवर निशाना साधला आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोल सुरू केला आहे आणि यात प्रश्न विचारला आहे की. पंतप्रधान मोदी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यास नकार देत आहेत, कारण ते -
यासाठी राहुल गांधींनी चार पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय - पीएम मोदी शेतकरी विरोधी आहेत, दुसरा पर्याय - पीएम मोदींना क्रोनी कॅपिटालिस्ट चालवत आहेत, तिसरा पर्याय - ते हट्टी आहेत आणि चौथा पर्याय - यांपैकी सर्व
शेतकऱ्यांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास नाही -यापूर्वीही देशातील शेतकऱ्यांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या काही जुन्या वक्तव्यांचा हवाला देत ट्विट केले, ‘प्रत्येक बँक खात्यात 15 लाख रुपये आणि दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या, 50 दिवस द्या, अन्यथा.... आपण कोरोना विरोधात 21 दिवसांत युद्ध जिंकू, ना कुणी आपल्या सीमेत घुसखोरी केली आहे, ना कुण्या चौकीवर कब्जा केला आहे.’ ते म्हणाले, ’मोदी जींच्या ‘असत्याग्रहा’च्या दीर्घ इतिहासामुळे शेतकरी त्यांच्यावर विश्वास करत नाहीत.
दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना देणार मोफत Wi-Fi सुविधा - दुसरीकडे, केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावरून सध्या राजकारणही जोरात सुरू आहे. याच दरम्यान आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिल्लीच्या केजरीवाल सरकारने मोफत वाय-फाय सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी सिंघू सीमेवर केजरीवाल सरकार फ्री वाय-फाय हॉट स्पॉट्स लावणार असल्याची माहिती मिळत आहे.
आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. "खराब नेटवर्कमुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना इंटरनेट वापरण्यामध्ये आणि कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलिंग करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी फ्री वाय-फाय हॉट स्पॉट्स लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. आंदोलनकर्त्यांकडून ज्या ज्या ठिकाणी वाय-फायची मागणी होईल तिथे हॉट स्पॉट लावले जातील" अशी माहिती राघव चड्ढा यांनी दिली आहे.