Rahul Gandhi Twitter: राहुल गांधी ट्विटरवर सुसाट...; दर आठवड्याला वाढताहेत 80 हजार फॉलोअर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 10:04 AM2022-03-07T10:04:52+5:302022-03-07T10:06:53+5:30
Rahul Gandhi Twitter: ऑगस्ट 2021मध्ये दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचा फोटो पोस्ट केल्यानंतर राहुल गांधींचे खाते वादात सापडले होते. त्यानंतर कंपनीने त्यांचे खाते 8 दिवसांसाठी बंद केले होते.
नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या पुन्हा एकदा वेगाने वाढू लागली आहे. दिल्ली बलात्कार प्रकरणातील वादग्रस्त ट्विटनंतर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या जवळपास थांबली असल्याचे वृत्त होते. या संदर्भात राहुल यांनी ट्विटरवर एक पत्रदेखील लिहिले होते, ज्यामध्ये त्यांनी कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांना घसरत्या आकड्यांबद्दल माहिती दिली होती.
फॉलोअर्सची संख्या वाढली
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ट्विटरवर राहुल गांधींच्या फॉलोअर्सची संख्या दर आठवड्याला सुमारे 80 हजारांच्या दराने वाढत आहे. 27 डिसेंबर 2021 रोजी राहुल यांनी त्यांचे फॉलोअर्स वाढत नसल्याचा आणि सरकार राजकीय दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता. मात्र, त्यादरम्यान कंपनीने विशेष प्रतिसाद दिला नाही. पण, आता काँग्रेस नेत्याचे खाते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. 12 जानेवारी ते आत्तापर्यंत 6 आठवड्यांत राहुलचे फॉलोअर्स दर आठवड्याला सुमारे 80 हजारांच्या वेगाने वाढले आहेत. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 2 कोटी झाली आहे.
8 दिवस बंद झाले अकाउंट
ऑगस्ट 2021 मध्ये दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचा फोटो पोस्ट केल्यानंतर राहुलचे खाते वादात सापडले होते. भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांच्या तक्रारीला उत्तर म्हणून ट्विटरने काँग्रेस नेत्याचे खाते 8 दिवसांसाठी बंद केले होते. राहुलने सीईओ अग्रवाल यांना लिहिलेल्या पत्रात आरोप केला होता की, तेव्हापासून त्यांना नवीन फॉलोअर्स मिळणे बंद झाले आहे. पण, आता त्यांचे खाते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे.