मुंबई - काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी सध्या ट्विटरवरून मोदी सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. इंधन दरवाढ, वाढती महागाई आणि बेरोजगारी यावरून ते सरकारला लक्ष्य करत आहेत. आता, पुन्हा एकदा आकडेवारी शेअर करत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यापूर्वीही राहुल गांधींनी महागाईवरुन मोदींचा मास्टरस्ट्रोस, असे म्हणत त्यांच्या धोरणांवर टिका केली होती.
भाजपने नरेंद्र मोदींच्या निवडणूक कॅम्पेनसाठी हर हर मोदी, घर घर मोदी ही टॅगलाईन वापरली होती. राहुल गांधींनी या टॅगलाईनला धरूनच मोदी सरकारवर टीका केली आहे. हर घर बेरोजगारी, घर घर बेरोजगारी... असे म्हणत राहुल गांधींनी मोदींवर टीका केली. यासोबतच, राहुल गांधींनी एका बातमीचे कात्रण शेअर केले आहे. त्यामध्ये, गेल्या 5 वर्षात 2.1 कोटी रोजगार घटल्याची माहिती देण्यात आली आहे. तर, 45 कोटी लोकांनी नोकरीचा शोधच सोडून दिला आहे, असेही या बातमीत म्हटले आहे. त्यावरुन, राहुल गांधींनी टिका करताना, ''75 वर्षात प्रथमच पंतप्रधानांच्या मास्टरस्ट्रोकमुळे 45 कोटींपेक्षा अधिक लोकं नोकरी शोधण्याची आशाच गमावून बसले आहेत, मोदी हे ते पंतप्रधान आहेत, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
महागाईवरुनही मोदींना लगावला टोला
राहुल गांधी म्हणाले, "महागाईचा दर 6.95 टक्क्यांवर आला आहे, तर एफडीचा व्याजदर 5 टक्क्यांवर आला आहे. तुमच्या बँक खात्यात 15 लाख जमा करणे विसरून जा, पीएम मोदींच्या 'मास्टरस्ट्रोक'ने तुमच्या कष्टाने कमावलेला पैसा नष्ट केला आहे." तसेच, राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 2022 मध्ये 2 लाख रुपये फिक्स केल्यास 11,437 रुपये मिळतात, तर 2012 मध्ये यापेक्षा जास्त 19,152 रुपये मिळत होते. दरम्यान, राहुल गांधींनी याला जन धन लूट योजना म्हटले आहे.