"सत्ताधाऱ्यांना संरक्षण मागावं लागल्याचे देशाने पाहिलं"; राहुल गांधींच्या विधानाचे राऊतांकडून समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 09:46 AM2024-07-02T09:46:31+5:302024-07-02T09:51:42+5:30

Sanjay Raut : लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजपलं घेरलं होतं.

Rahul Gandhi unmasks BJP fake Hindutva says Sanjay Raut | "सत्ताधाऱ्यांना संरक्षण मागावं लागल्याचे देशाने पाहिलं"; राहुल गांधींच्या विधानाचे राऊतांकडून समर्थन

"सत्ताधाऱ्यांना संरक्षण मागावं लागल्याचे देशाने पाहिलं"; राहुल गांधींच्या विधानाचे राऊतांकडून समर्थन

Parliament Session :संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान मोदींसह भाजपवर जोरदार निशाणा साधला. हिंदूंबाबत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यानं लोकसभेत मोठा गदारोळ झाला. भाजप देशात हिंसाचार, द्वेष आणि भीती पसरवल्याचा आरोप करत भाजपचे हे लोक हिंदू नाहीत असे वक्तव्य राहुल गांधींनी केले. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याने सत्ताधाऱ्यांनी आक्रमक होत त्यांचा विरोध सुरु केला. दुसरीकडे, संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या प्रकरणावरुन आता देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा संसदेत उतरवल्याची खोचक टीका केली आहे.

सोमवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षा आणि अग्निपथ भरती योजनेतील पेपर फुटल्याच्या आरोपावरून सरकारवर हल्लाबोल केला होता. याशिवाय भगवान शिवाचे चित्र दाखवताना फोटो दाखवत राहुल गांधी यांनी स्वतःला हिंदू म्हणवणारे लोक हिंसेची चर्चा करतात, तर भगवान शिव शांतीचा संदेश देतात, असे म्हटलं. राहुल गांधींच्या या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आक्षेप घेतला होता. राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली.

राहुल गांधी यांच्या विधानानंतर ठाकरे गटाचे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले की, "स्वतःला हिंदू म्हणवून घेणारे लोक संसदेतच बसले होते. त्यांचे कान स्वच्छ असते आणि त्यांनी ऐकले असते आणि त्यांना कळले असते की, राहुल गांधी यांनी एकटा भाजप हा हिंदू समाज नाही, असे म्हटले होते." 

एक गृहमंत्री आणि नरेंद्र मोदी यांना राहुल गांधी भारी पडले - संजय राऊत

"भाजपच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा काल उतरवला. राहुल गांधी यांनी काल काय चुकीचे सांगितले. उद्धव ठाकरेंवर भाजप नेहमी आरोप करतो की त्यांनी हिंदुत्व सोडलं. तेव्हा उद्धव ठाकरे जे बोलतात तेच राहुल गांधी म्हणाले. आम्ही भाजला सोडलं हिंदुत्वाला सोडलं नाही असे उद्धव ठाकरे सांगतात. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. राहुल गांधींनी काल नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या तोंडावर सांगितले की हिंदुत्वाचा तु्म्ही ठेका घेतलेला नाही. हिंदुत्वाचा विचार तु्म्हाला कधी समजला नाही. नऊ मंत्री, एक गृहमंत्री आणि नरेंद्र मोदी यांना राहुल गांधी काल भारी पडले. त्यांना वारंवार हस्तक्षेप करावा लागला. आपली बाजू मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे संरक्षण मागावे लागले. कालचे चित्र फार विचलित करणारे होते. १० वर्षात पहिल्यांदाच देशाच्या मजबूत गृहमंत्र्यांना संसदेत ओम बिर्ला यांच्याकडे संरक्षण मागावे लागले. कालपर्यंत आम्हाला यांच्यापासून संरक्षण मागावं लागत होतं. एवढी यांचा हुकुमशाही होती. पण राहुल गांधीनी त्यांना संसदेत गुढघ्यावर आणलं आणि त्यांना ओम बिर्लांकडे संरक्षण मागावं लागल्याचे चित्र देशाने पाहिलं. प्रामाणिक विरोधी पक्षनेता काय असतो हे दिसलं. ही सुरुवात आहे," असे संजय राऊत म्हणाले.
 

Web Title: Rahul Gandhi unmasks BJP fake Hindutva says Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.