Rahul Gandhi vs Smriti Irani: चार महिन्यांनंतर लोकसभेत परतलेले खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी मणिपूरच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केल्याचा आरोप राहुल यांनी यावेळी केला. त्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी सरकारच्या वतीने उत्तर दिले. स्मृती म्हणाल्या की, मणिपूर खंडित किंवा विभागला गेला नाही. स्मृती इराणींचे भाषण झाले तोपर्यंत राहुल गांधीसंसदेतून निघून गेले होते, यावरुनही केंद्रीय मंत्र्यांनी त्यांना टोमणा लगावला.
लोकसभेत काँग्रेसवर निशाणा साधत स्मृती इराणी म्हणाल्या की, ज्याप्रकारे सभापतींच्या आसनाजवळ आक्रमक वर्तन केले गेले, ते निषेधार्ह आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतमातेची हत्या झाल्याचे बोलले गेले आणि काँग्रेस पक्षाचे नेते यावर टाळ्या वाजवत होते. त्यांच्या आघाडीतील लोक भारताबद्दल चुकीचे भाष्य करतात. काश्मीरवर सार्वमत घेण्याची वक्तव्ये करतात, राहुल गांधींमध्ये हिंमत असेल तर या विधानांचा निषेध करा. काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याच्या चर्चेला काँग्रेसचे समर्थन आहे का? या काळात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचा उल्लेख स्मृती इराणी यांनी केला.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात मोदी सरकार गौतम अदानींची बाजू घेत असल्याचा आरोप केला, त्यावर स्मृती इराणी यांनी पलटवार केला. अशोक गेहलोत यांनी राजस्थानमध्ये अदानीसोबत तडजोड का केली, केरळ, महाराष्ट्र किंवा छत्तीसगडच्या सरकारांनी गौतम अदानी यांना काम का दिले, असा सवाल इराणी यांनी यावेळी विचारला. तसेच, यूपीए सरकारच्या काळातही गौतम अदानी यांना कर्ज देण्यात आले होते, यावर राहुल गांधी का बोलत नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
संबंधित बातमी- "राहुल गांधी, तुमच्यात जर हिंमत असेल तर..."; स्मृती इराणी यांनी संसदेतच दिलं खुलं आव्हान