राहुल गांधी योद्धा; झुकले नाहीत, प्रियांका गांधी यांची भावना, उत्तर प्रदेशात ‘भारत जोडो’चा प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 06:30 AM2023-01-04T06:30:28+5:302023-01-04T06:31:29+5:30
राहुल आणि प्रियांका गांधी लोणी सीमेवर गाझियाबाद येथे बांधलेल्या व्यासपीठावर एकत्र आले.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ यात्रा ९ दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी उत्तर प्रदेशात दाखल झाली. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गाझियाबादमध्ये बंधू राहुल गांधी यांचे जोरदार स्वागत केले. ‘राहुल गांधी योद्धा आहेत, ते सरकारपुढे झुकले नाहीत,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
राहुल आणि प्रियांका गांधी लोणी सीमेवर गाझियाबाद येथे बांधलेल्या व्यासपीठावर एकत्र आले. यावेळी प्रियांका गांधी राहुल गांधींना उद्देशून म्हणाल्या, मला तुमचा अभिमान आहे. सरकारने त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती, हजारो कोटी रुपये खर्च केले; पण ते घाबरले नाहीत. ते योद्धे आहेत... उद्याेगपतींनी देशातील सर्व सार्वजनिक उपक्रम खरेदी केले.
देशातील प्रसारमाध्यमे विकत घेतली; पण माझ्या भावाला विकत घेऊ शकले नाहीत आणि घेऊ शकणार नाहीत. राहुल गांधी ३ दिवसांत युपीमध्ये १३० किलोमीटर पायी चालणार आहेत.
रामजन्मभूमी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांचे आशीर्वाद
उत्तर प्रदेशात यात्रा सुरू होण्यापूर्वी अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी राहुल गांधींना आशीर्वाद देऊन यात्रेच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.