शीलेश शर्मा,
नवी दिल्ली- माजी सैनिक रामकिशन यांची आत्महत्या आणि ‘वन रँक, वन पेन्शन’ या मुद्द्यावरून देशभरात काँग्रेसने मोदी सरकार आणि भाजपाविरोधात आंदोलन करण्याचे ठरविले असून, त्याचा पहिला टप्पा म्हणून दिल्लीत मेणबत्ती मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात असताना, राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले.जंतर मंतर ते इंडिया गेट असा मेणबत्ती मोर्चा काढून गरेवाल यांना श्रद्धांजली वाहण्याचे आणि वन रँक वन पेन्शनसाठी आवाज उठवण्याचे दिल्ली काँग्रेसने ठरविले होते. त्यासाठी राहुल गांधी जंतर मंतरपाशी पोहोचताच पोलिसांनी लगेच त्यांना अडवून ताब्यात घेतले आणि पोलीस व्हॅनमध्ये बसवले. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते खूपच संतापले.काही वेळाने पोलीस व्हॅन फिरोजशहा मार्गावर गेली. तिथे त्यांना सोडून देण्यात आले. जंतर मंतरपाशी खूपच गर्दी झाली होती. त्यामुळे आम्ही राहुल गांधी यांना सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस व्हॅनमध्ये बसवले, त्यांना अडवण्यात वा ताब्यात घेण्यात आले नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. राहुल यांनी मात्र, आपणास पोलिसांनी अडवून ताब्यात घेतल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ‘पोलिसांनी काल गरेवाल यांच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले व मारहाण केली. तो प्रकार चुकीचा होता. त्याबद्दल पोलिसांनी माफी मागायला हवी, अशी आपली मागणी आहे.’