नवी दिल्ली:काँग्रेस नेते मनीष तिवारी यांचे नवीन पुस्तक '10 Flash Points; 20 Years - National Security Situations that Impacted India' यामध्ये त्यांनी मनमोहन सिंग सरकारवर मुंबईतील 26/11 च्या घटनेवरुन निशाणा साधला आहे. दरम्यान, भाजपनेही काँग्रेस, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर त्याच 26/11 च्या हल्ल्यावरुन टीका केली आहे.
काँग्रेसच्या अपयशाची कबुली-भाजपयाला काँग्रेसच्या अपयशाची कबुली म्हणणे योग्य ठरेल, असे मत भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले, प्रत्येक भारतीयाप्रमाणे आम्हालाही खूप वेदना होत होत्या. तत्कालीन काँग्रेस सरकारला राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर भारताच्या अखंडतेची चिंता नव्हती. सोनिया-राहुल त्यांचे मौन तोडणार का? सोनिया गांधींना प्रश्न आहे की त्यांनी भारतीय सैन्याला खुले स्वातंत्र्य आणि परवानगी का दिली नाही? या प्रश्नाची उत्तरे जाणून घेणे देशासाठी महत्त्वाचे असल्याने भाजप हा प्रश्न उपस्थित करत आहे, असे ते म्हणाले.
राहुल गांधी नाच-गाणं करत होतेते पुढे म्हणाले की, काँग्रेसने शहीदांच्या हौतात्म्याची खिल्ली उडवली. सोनिया गांधी तुम्हाला सांगावे लागेल की, लष्कराला तेव्हा परवानगी का दिली नाही ? आमच्या सैन्यावर तुमचा विश्वास नव्हता का? जेव्हा आपल्या देशावर हल्ला होत होता, तेव्हा राहुल गांधी सकाळपर्यंत नाच-गाणं करत होते, अशी बातमी एका वर्तमानपत्रात आली होती. काही दिवसांपूर्वी नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, इम्रान खान आमचे मोठे भाऊ आहेत. देश राहुल गांधींना विचारतोय की आमच्या पोलीस आणि कमांडोंनी दिलेल्या हौतात्म्याचा बदला पाकिस्तानकडून घेण्यात तुम्हाला यश का आले नाही ? पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने भारताची ताकद काय आहे हे दाखवून दिले आहे. उरीमध्ये पाकिस्तानने हल्ला केला तेव्हा सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला चपराक दिली होती, हे लक्षात ठेवा.
सैन्य मनमोहन सिंगांकडे परवानगी मागत राहिली-भाजप
ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आमचे लष्कर मनमोहन सिंग यांच्याकडे परवानगी मागत होते, पण काँग्रेसने परवानगी दिली नाही. असं काय झालं होतं, की सोनिया गांधींनी सैन्याला परवानगी दिली नाही ? पुलवामा हल्ल्यावर आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला. पाकिस्तानचे शेकडो सैनिक मारले. पण 26/11 च्या हल्ल्यानंतर काँग्रेसने लष्कराला परवानगी दिली नाही नाही, असा हल्लाबोल भाटिया यांनी केला.