नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीमध्य प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहे. सोमवारी त्यांनी इंदूरमध्ये रोड शो केला, यानंतर शहराची भ्रमंती करण्यासाठी ते संध्याकाळी बाहेर पडले. यावेळेस राहुल यांनी इंदूरमधील आईस्क्रीमचा स्वाद घेतला. स्वतःसोबत त्यांनी एका लहान मुलालाही आईस्क्रीम खाऊ घातले. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःच्या चमच्यानं लहान मुलाला आईस्क्रीम भरवलं.
चवदार पाककृतींसाठी इंदूरमधील प्रसिद्ध असलेले '56 Dukan' येथे राहुल गांधी ज्योतिरादित्य सिंधिया आणि कमलनाथ यांच्यासोबत पोहोचले होते. येथे राहुल यांनी सुरुवातीस आईस्क्रीमचा स्वाद घेतला आणि यानंतर तेथील अन्य स्वादिष्ट पदार्थ चाखले. राहुल गांधी आल्यानं दुकानदारानं त्यांच्याकडून एकही रुपया घेतला नाही.
('कन्फ्युज' राहुल गांधींविरोधात शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाने दाखल केला मानहानीचा खटला)
मध्य प्रदेशच्या या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत येथील मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर टीका केली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर टीका करण्याच्या नादात चौहान यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्स प्रकरणाशी जोडल्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्या टीकेमुळे संतप्त झालेले शिवराज सिंह चौहान यांचे पुत्र कार्तिकेय यांनी राहुल गांधींविरोधात मंगळवारी मानहानीचा खटला दाखल केला आहे.
शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्सशी जोडल्याने राहुल गांधींवर टीका होत आहे. दरम्यान, चूक लक्षात आल्यानंतर राहुल गांधी यांनी आपण कन्फ्युज झाल्याने शिवराज सिंह यांच्या मुलाचे नाव घेतले, असे स्पष्टीकरण दिले होते. "मध्य प्रदेश आणि भाजपा शासित राज्यांत मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याने मी संभ्रमात होतो. खरं तर पनामा पेपर्स घोटाळ्यात शिवराज सिंह यांच्या मुलाचं नव्हे, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या मुलाचे नाव आहे. शिवराज सिंह यांचे नाव तर व्यापमं घोटाळ्यात होते, अशी सारवासारव केली.