Rahul Gandhi Wayanad Rally:काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी (13 फेब्रुवारी) केरळमधील वायनाड येथे जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींवर (Narendra Modi) जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधींनी अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन पंतप्रधानांना घेरले आणि अदानींचा पैसा शेल कंपनीत असल्याचे सांगितले. 'आम्ही पंतप्रधानांना प्रश्न विचारला, पण पंतप्रधानांनी उत्तर दिले नाही. अदानींसाठी नियम बदलले,' असा आरोप त्यांनी केला.
'पंतप्रधानांनी माझा अपमान केला'
राहुल गांधी पुढे म्हणाले की, 'संसदेतील माझ्या भाषणातील काही भाग काढून टाकण्यात आला. मी कोणाचाही अपमान केला नाही. मी जे बोललो त्याबाबत मला पुरावे दाखवण्यास सांगितले होते आणि मी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले, ज्यातून त्यांनी पुराव्यासह प्रत्येक मुद्दा हटवला. माझे शब्द रेकॉर्डवर जातील अशी मला अपेक्षा नव्हती. देशाचे पंतप्रधान थेट माझा अपमान करतात, पण त्यांचे शब्द काढले जात नाहीत,' अशी प्रतिक्रिया राहुल यांनी दिली.
"आम्ही त्यांना घाबरत नाही"
राहुल पुढे म्हणाले, 'मोदी म्हणतात की, तुमचे नाव गांधी का आहे, नेहरू का नाही? सत्य नेहमीच बाहेर येते. मी बोलत असताना माझा चेहरा आणि ते बोलत असताना त्यांचा चेहरा पाहा. पीएम किती वेळा पाणी प्यायले आणि पाणी पिताना त्यांचे हातही थरथरत होते. पंतप्रधानांना वाटते की, ते खूप शक्तिशाली आहेत आणि लोक त्यांना घाबरतील, पण आम्ही त्यांना घाबरत नाही. एक दिवस त्यांना त्यांच्या वास्तवाला सामोरे जावे लागेल. या देशातील प्रत्येकाने संसदेचे कामकाज पाहणे, देशात काय चालले आहे हे पाहणे आणि पंतप्रधान आणि अदानी यांच्यातील संबंध समजून घेणे महत्त्वाचे आहे,' असंही राहुल म्हणाले.