Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदारराहुल गांधी यांच्यावर लोकसभा सचिवालयाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी 'मोदी' आडनावावर केलेल्या टीकेनंतर सूरत सत्र न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर अवघ्या चोवीस तासांच्या आत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. या कारवाईनंतर काँग्रेस नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
मल्लिकार्जुन खर्गेंची टीकाराहुल गांधी यांच्याविरोधातील कारवाईनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, 'राहुल गांधी यांना अपात्र ठरवण्यासाठी भाजपने सर्व प्रकारचे प्रयत्न केले. सत्य बोलणाऱ्यांना ठेवायचे नाही, अशी भाजपचे राजकारण आहे. पण आम्ही सत्य बोलत राहू, आम्ही जेपीसीची मागणी करत राहू. गरज पडल्यास लोकशाही वाचवण्यासाठी तुरुंगातही जायला आम्ही तयार आहोत. आज संध्याकाळी 5 वाजता पक्ष कार्यालयात आमच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आम्ही पुढची रणनीती ठरवू,' अशी माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली.
जयराम रमेश काय म्हणाले?'आम्ही कायदेशीर आणि राजकीय, दोन्ही प्रकारे ही लढाई लढत राहू. आम्ही भाजपला घाबरणार नाही किंवा गप्प बसणार नाही. पीएम मोदी यांच्या संबंधित अदानी महामेगा स्कॅममध्ये जेपीसीऐवजी राहुल गांधी अपात्र ठरले आहेत. भारतीय लोकशाही ओम शांती,' असे काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी जयराम रमेश म्हणाले.