नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांपासून सोनिया गांधींकडे प्रभारी अध्यक्षपद सोपवून कारभार हाकत असलेल्या काँग्रेसला लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. मात्र या पदावरील निवडीसाठी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर माथेफोड सुरू आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे या पदाची जबाबदारी स्वीकारण्यास फारसे उत्सुक नाही आहेत. मात्र पक्षातील अनेक नेते हे त्यांना अध्यक्ष बनवण्यासाठी अनुकूल आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यासाठी पक्षामध्ये एकमत आहे, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिली.
याआधी २०१७ मध्ये राहुल गांधी यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं होतं. तेव्हापासून सोनिया गांधी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत. आता २० सप्टेंबरपर्यंत काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.
अशोक गहलोत यांनी सांगितले की, देशभरामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. जर राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनले नाहीत तर ही बाब काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी निराशाजनक ठरेल. अनेक जण घरी बसतील, त्यामुळे पक्षाचं नुकसान होईल. राहुल गांधी यांनी प्रत्येक काँग्रेसी नेत्याच्या भावनांचा विचार करून अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
गहलोत यांनी सांगितले की, काँग्रेसने ७५ वर्षांपर्यंत देशात लोकशाहीला जिवंत ठेवले आहे. ही देशाला काँग्रेसने दिलेली भेट आहे. पुढील वर्षी राजस्थानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुन्हा एकदा विजयी होईल, असा विश्वास गहलोत यांनी व्यक्त केला.