हैदराबाद, दि. 15 - काँग्रेस पक्षांतर्गत निवडणूक घेऊन राहूल गांधींना पक्षाध्यक्ष बनायला आवडेल अशा आशयाचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी केले आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये राहुल यांनी सूचित केल्याप्रमाणे ते काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची व नंतर 2019 च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पक्षाने दिली तर आपण ही जबाबदारी पेलू असे वक्तव्य गांधी यांनी केले होते.
राहूल गांधी यांनी ताबडतोब पक्षाचे अध्यक्ष व्हावे अशी इच्छा मोईली यांनी व्यक्त केली. तसेच राहुल गांधी अध्यक्ष झाल्यास काँग्रेससाठी गेम चेंजर ठरवणारी घटना असेल असेही मोईली म्हणाले. यामुळे काँग्रेसच नाही तर देशासाठीही हे शुभवर्तमान असेल ते म्हणाले. काँग्रेसमध्ये प्रत्येकाची अशी भावना आहे की राहूल यांना अध्यक्ष करण्यास आधीच विलंब झालेला आहे. आता, राहूल हे पक्षाच्या निवडणुकांसाठी थांबले असून ही निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतरच राहूल ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवडून येतील असे ते म्हणाले, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.
राज्यांमधली निवडणुकीची प्रक्रिया या महिन्यात संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर देशपातळीवरील निवडणुका घेण्यात येणार आहेत. आणि ही प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यामध्ये राहूल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष असतील का यावर वीरप्पा मोईली यांनी होय असे उत्तर दिले आहे.
काँग्रेसला चांगले दिवस येण्यासाठी राहूल प्रयत्न करत असल्याचे मोईली यांनी सांगितले. भारतात प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी असून त्या त्या राज्यातील स्थितीप्रमाणे प्रश्न हाताळायला लागतात असे त्यांनी सांगितले. त्यादृष्टीने राज्यांच्या निवडणुकांचे वेगवेगळे धोरण आखण्याची तसेच 2019 च्या निवडणुकांसाठी वेगळे धोरण आखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
राज्यांमध्ये पदाधिकारी असलेल्यांमध्ये तातडीने बदल करण्याचे धोरण राहूल यांनी स्वीकारावे असे मत मोईली यांनी व्यक्त केले. तळापासून ते वरपर्यंत सगळ्या ठिकाणी संघटनात्मक बदल करण्याची गरज आहे असे मोईली म्हणाले. सध्याच्या रालोआच्या सरकारला सक्षम पर्याय म्हणून लोकांना काँग्रेस वाटेल इतका आमूलाग्र बदल करावा लागेल असे मोईली म्हणाले. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असून काँग्रेसला बहुमत मिळेल यात काहीही शंका नाही असा दावाही त्यांनी केला आहे. भाजपाचं कर्नाटकात पुनरागमन होणं अशक्य असल्याचं ते म्हणाले.भाजपा सरकारनं निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासन पाळली नसल्याचा आरोप मोईली यांनी केला आहे. अर्थव्यवस्था मंदावली असून निर्यातही घटल्याचे ते म्हणाले. रालोआ पूर्णपणे अपयशी झाल्याचा आरोप त्यांनी केला. सध्याच्या मोदी सरकारबाबत असलेला फुगा 2019 च्या निवडणुकांमध्ये फुटेल असा ठाम विश्वास मोईली यांनी व्यक्त केला आहे.