जयराम रमेश यांचे संकेत : काँग्रेसला गतवैभव प्राप्त होईल; पक्षाला राज्यस्तरीय नेतृत्वाची गरजहैदराबाद : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या खांद्यावर याच वर्षात पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी बुधवारी याबाबतचे संकेत दिले. राहुल गांधी याचवर्षी पक्षाध्यक्ष होतील आणि राज्यात सक्षम नेतृत्व तयार करून काँग्रेसचे गतवैभव परत मिळवतील, अशी अपेक्षा रमेश यांनी बोलून दाखवली.वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. काँग्रेसला राज्यस्तरावर नेतृत्वाची गरज आहे, असे राहुल यांचे मत आहे. जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळातील वैभव परत मिळावे, असे त्यांना वाटते. तेव्हा पक्षाकडे कामराज, प्रतापसिंह कैरों, यशवंतराव चव्हाण, बी.सी. राय, जी.बी. पंत यासारखे दिग्गज नेते होते. आजघडीला काँगे्रसला अशाच उमद्या नेतृत्वाची गरज आहे. कारण पक्ष केवळ राष्ट्रीय निवडणुका नाही तर राज्यातील निवडणुकाही लढत आहे. सर्वसामान्य लोकांमधून नेते घडावेत, असे त्यांना वाटते, असे त्यांनी सांगितले.पक्षात ज्येष्ठांचा गट वा युवांचा गट असे काहीही नाही. काँग्रेस हा केवळ एक समूह आहे. प्रत्येक संस्थेला दर २०-२५ वर्षांनी बदलाच्या प्रक्रियेतून जावे लागले. काँग्रेसमध्येही या प्रक्रियेचे पालन होते. नव्या चेहऱ्यांना संधी देणे, त्यांना अधिकार देणे, त्यांच्याकडे नेतृत्व सोपवणे, हा याच प्रक्रियेचा भाग आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)राहुल यांनी अलीकडे घेतलेली दीर्घरजा व राजकारणातील त्यांचा सक्रिय सहभाग यावरही जयराम रमेश यांनी भाष्य केले. राहुल गांधी आक्रमक आहेत. संसदेत त्यांनी आपल्या सक्रिय भूमिकेचे दर्शन घडविले. शेतकऱ्यांच्या मुद्यावर विविध राज्यांत ते पदयात्रा करीत आहेत. माझ्या मते, आता एक नवीन राहुल गांधी देश बघत आहेत. राहुल यांचे हे नवे रूप आहे. आपल्याकडून देशाला काय अपेक्षित आहे आणि आपल्यापुढे काय आव्हाने आहेत, हे त्यांना कळले आहे. त्यामुळे रजेवर जाण्याचा त्यांचा निर्णय योग्य होता आणि ते सिद्ध झाले, असेच मी म्हणेल, असे रमेश म्हणाले.
राहुल गांधी यंदाच बनणार पक्षाध्यक्ष
By admin | Published: May 21, 2015 12:44 AM