हैदराबाद - राहुल गांधी 2019 मध्ये पंतप्रधान होतील असे भाकित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी वर्तविले आहे. ते शुक्रवारी हैदराबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाविषयी विश्वास व्यक्त करत त्यांच्यामुळेच गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले. राहुल गांधींनी गुजरातमध्ये गांभीर्याने लक्ष घातले असून ते खूप मेहनतीने दौरे करत आहेत. त्यांच्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना नवा हुरूप आला आहे, असेही यावेळी मोईली यांनी सांगितले.राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्त्व गेल्यास संघटनेत अनेक मुलूभत बदल घडतील. ते संघटनेसाठी नवा चेहरा ठरतील. त्यांना संघटनात्मक आणि सरकारमध्ये काम करण्याचा पुरेसा अनुभवही आहे. त्यामुळे 2019 मध्ये राहुल हेच देशाचा चेहरा ठरतील आणि पंतप्रधान म्हणून सत्तेत परततील, असा विश्वास मोईली यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आज काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल गांधी यांच्याकडे जाणार असल्याचे सोनिया गांधी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्या म्हणाल्या की, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून जो प्रश्न विचारत आहात त्याचं उत्तर आता तुम्हाला लवकरच मिळणार आहे, असे सोनिया हसतहसत म्हणाल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेससह अनेक राज्यांतून राहुल यांना पक्षाध्यक्ष बनवण्यात यावे, असे ठराव संमत करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर एनडीटीव्हीशी बोलताना सोनिया गांधी यांनी राहुल यांच्याकडे लवकरच पक्षाची सूत्रे सोपवली जातील, असे प्रथमच सांगितले आहे.