राहुल गांधी यांना घेरणार, संसदीय नियमांनुसारच कारवाईची भाजपची रणनीती तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 11:27 AM2023-03-09T11:27:29+5:302023-03-09T11:28:24+5:30
राहुल गांधींनी दिलेल्या नोटिशीच्या उत्तरावर भाजप खा. शशिकांत दुबे यांना १० मार्चला संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर हजर होण्यासाठी बोलावण्यात आले आहे.
संजय शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ब्रिटिश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मोदी सरकारवर हल्लाबोल केल्याचे उत्तर भारतीय जनता पार्टी संसदेत देणार आहे. राहुल गांधींनी दिलेल्या नोटिशीच्या उत्तरावर भाजप खा. शशिकांत दुबे यांना १० मार्चला संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर हजर होण्यासाठी बोलावण्यात आले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी नेहमीप्रमाणे यावेळीही आपल्या विदेश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोदी सरकार, संघाच्या विरोधात ज्याप्रमाणे हल्लाबोल करीत आहेत, ते पाहता मोदी सरकार व भाजपनेही त्यांना घेरण्याची रणनीती तयार केली आहे. मोदी सरकारच्या रणनीतीकारांनी राहुल गांधी यांना संसदीय नियमांनुसारच घेरून त्यांच्यावर कारवाई करण्याची रणनीती तयार करण्यात आली आहे. संसदेच्या विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार सिंह यांनी सांगितले की, समितीला राहुल गांधी यांचे उत्तर मिळाले आहे. समिती दुबे यांच्याशी १० मार्चला त्यांच्या आरोपांवर चौकशी करील.
भाजपने काँग्रेसला केलेले सवाल...
- राहुल गांधी यांनी भारताबाबत केलेल्या वक्तव्यावर माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आक्रमक झाले.
- त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना विचारले आहे की, युरोप व अमेरिकेने भारतात दखल द्यावी, या राहुल गांधी यांच्या आरोपांशी काँग्रेस पक्ष सहमत आहे का? सहमत नसेल तर पक्षाने ते विधान फेटाळावे.
- भारताच्या विदेश नीतीचा पाया हाच आहे की, भारत आपल्या अंतर्गत प्रकरणांमध्ये जगातील कोणत्याही देशाची दखल किंवा मध्यस्थी स्वीकार करीत नाही. राहुल यांनी देशाच्या या सर्वांत मोठ्या नीतीकडे दुर्लक्ष केले आहे.
- देशातील जनता राहुल गांधी यांचे काहीही ऐकत नसल्यामुळे ते विदेशात जाऊन बोलत आहेत. नरेंद्र मोदींचा विरोध करताना ते आता भारताचा विरोध करीत आहेत.
- देशात लोकशाही नाही, माध्यमे स्वतंत्र नाहीत, कोणालाही आपले म्हणणे मांडण्याचे स्वातंत्र्य नाही, अशा गोष्टी विदेशात बोलून राहुल गांधी देशाचा अपमान करीत नाहीत का, असा सवालही त्यांनी केला आहे.
फुटेजवरून कारवाई होण्याची शक्यता
सूत्रांचे म्हणणे आहे की, राहुल गांधी यांच्याविरोधात सरकार कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. दुबे यांचे तक्रार पत्र व लोकसभेच्या कारवाईच्या थेट प्रक्षेपणाचे फुटेज यावरून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
कर्नाटकने वाढविले भाजपचे ‘टेन्शन’...
कर्नाटकच्या २२४ जागांच्या विधानसभेच्या निवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे. पुढील आठवड्यात निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखांची कधीही घोषणा करू शकतो. सूत्रांचे म्हणणे आहे की, एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. कर्नाटक विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी जादुई संख्या ११३ आहे. राज्यात त्रिकोणी संघर्ष होण्याची शक्यता असून, कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणे आव्हानात्मक दिसते. भारतीय जनता पक्षाला यावेळी सत्ता वाचविणे अवघड दिसते. याचमुळे होळी संपताच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आपल्या लवाजम्यासह कर्नाटकला रवाना झाले आहेत. प्रत्येक तिसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग कर्नाटकच्या दौऱ्यावर जात आहेत. बहुतेक प्रत्येक आठवड्यात एक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकच्या दौऱ्यावर जात आहेत. यावरून कर्नाटकचे आव्हान भाजपने किती गांभीर्याने घेतले आहे, हे दिसून येते.