शीलेश शर्मानवी दिल्ली :बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आपल्या आघाडीतील मित्रपक्षांसोबत उत्साहाने प्रचार करीत आहे कारण बिहारचे मतदार यावेळी बदल घडवतील, अशी त्याला खात्री आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी २३ ऑक्टोबरपासून प्रचारात असतील. सध्याच्या नियोजनानुसार ते ८-१० सभांत बोलतील. २८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होईल. त्यात काँग्रेसच्या २१ उमेदवारांचे भवितव्य ठरेल. पक्षाचे वरिष्ठ नेते डॉ. शकील अहमद यांना वाटते की, पहिल्या टप्प्यातच काँग्रेस पुढे असेल. २१ पैकी किमान १५ उमेदवार जिंकून येतील.
दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ नोव्हेंबरला आहे. त्यात काँग्रेसचे २४ उमेदवार आहेत. त्यातील १६ जण निवडून येतील, असा पक्षाचा अंदाज आहे. शेवटच्या टप्प्याचे मतदान ७ नोव्हेंबरला असून त्या दिवशी काँग्रेसच्या २५ उमेदवारांचे भवितव्य ठरेल. या टप्प्यातही १६ उमेदवार जिंकतील, असे त्याला वाटते.
काँग्रेसच्या या आशेचा पाया हा नितीशकुमार सरकारचे अपयश आणि अमित शहा यांची चुकीची निवडणूक धोरणे आहेत. या परिस्थितीचा काँग्रेस आणि महा गठबंधन पूर्ण लाभ प्रचारात घेत आहेत. भाजपच्या दुहेरी राजकारणाचा व्यापक परिणाम होत असल्याचे ते लोकांना सांगत आहेत. काँग्रेस, डावेपक्ष आणि राजदच्या जोरदार प्रचाराने भाजप आणि नितीश घाबरले असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका राज्यसभा सदस्याने चर्चेत म्हटले की, लोजपसोबत भाजपने जो खेळ खेळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे भाजप आणि नितीशकुमार यांचे मोठे नुकसान होऊ शकते.
मतदारांमध्ये मोठा संभ्रम -काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने म्हटले की, रामविलास पासवान यांच्या निधनानंतर भाजपने ज्या प्रकारे लोजपसोबत पडद्याआड गठबंधन केले त्यामुळे मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे नितीशकुमार भाजपच्या रणनीतीवरून साशंक आहेत. त्यांच्या शंकेचे मोठे कारण निवडणुकीनंतर भाजप आणि लोजपशी हात मिळवणी आहे.