नवी दिल्ली - भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीवरुन संबित पात्रांनी शिवसेनेला लक्ष्य केलं. तसेच, बाळासाहेबांच्या एका जुन्या व्हिडीओची आठवणही पात्रा यांनी करुन दिली. टीव्हीवरील डिबेटमुळे संबित पात्रा माध्यमात आणि सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. आता, आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलंय.
शिवसेनेवर टीका करताना पात्रा यांनी दिवंगत नेते बाळासाहेबांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये, बाळासाहेबांनी काँग्रेसवर टीका केली आहे. सन 2004 साली पत्रकारांना बोलताना बाळासाहेब तडजोडीच्या राजकारणावर बोलत होते. मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, कधीच नाही. जेव्हा मला माहित होईल की, तसं झालंय. मी माझं दुकान बंद करेल, असे बाळासाहेबांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे, शिवसेना निवडणूक लढवणार नाही, असे म्हणत बाळासाहेबांनी नारायण राणेंना लक्ष्य केल्याचं या व्हिडीओतून अंदाज लावता येईल. कारण, आज जो तुम्हाला मान मिळतोय, सन्मान मिळतोय तो शिवसेनेमुळेचं, असं बाळासाहेब बोलताना दिसत आहेत. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी बाळासाहेबांचा हा व्हिडिओ शेअर करुन शिवसेनेला डिवचलंय.