ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. ३० - रोहितला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आहोत, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला याच्या आत्महत्येप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेले राहुल इतर आंदोलकांसह उपोषणास बसले होते. यावेळी तेथे रोहितची आईही उपस्थित होती.
' एका युवकाला आपलं स्वप्न पूर्ण होण्याआधीच जीव गमवावा लागला. आज देशातील कोणत्याही युवकाला अन्याय सहन करण्याची गरज नाही तर प्रत्येकाला आपली स्वप्न पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्याचा अधिकार आहे. महात्मा गांधी याच्या पुण्यतिथीच्या दिवशी आम्ही रोहितला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र आलो आहोत आणि जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील', असे राहुल यांनी सांगितले.
रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी निषेध नोंदवत विद्यार्थ्यांनी विद्यापीठात आंदोलन सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राहुल गांधी शुक्रवारी रात्री हैदराबादमध्ये पोहोचले आणि सुमारे दोन तास ते आंदोलकांसह ठिय्या आंदोलनात सहभागी झाले.
मृत रोहित वेमुलाचा आज (३० जानेवारी) वाढदिवस असून त्यानिमित्त विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन आणखीनच तीव्र करत कँडल मार्च काढून रोहितला श्रद्धांजली वाहिली. दरम्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनापूर्वी विद्यापीठाचे अंतरिम कुलगुरू विपिन श्रीवास्तव सुट्टीवर गेले आहेत.
रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर राहुल गांधी यांनी दुसऱ्यांदा हैदराबादला भेट दिली आहे. दरम्यान याप्रकरणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी तसेच केंद्रीय राज्यमंत्री बंडारु दत्तात्रेय यांना हटविण्याची मागणी होत आहे. तसेच कुलगुरू अप्पाराव पोडिले यांना पदावरून हटवावे व प्रभारी उपकुलगुरू विपिन श्रीवास्तव यांनी पदभार सोडावा, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.
हैदराबाद विद्यापीठात शिकणा-या रोहित वेमुलाने विद्यापीठात होणा-या भेदभावामुळे १७ जानेवारी रोजी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.