राहुल गांधी गुरुवारी वायनाडमधून अर्ज भरणार, रोड शोही करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 08:03 AM2019-04-03T08:03:33+5:302019-04-03T08:03:54+5:30
दक्षिणेवरील अन्याय दूर करण्याचा दावा
वायनाड/नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी निवडणुकीची अर्ज भरण्यासाठी येथे गुरुवारी येणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस व केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी येथे सांगितले. राहुल गांधी बुधवारी संध्याकाळी कोळीकोड (कालिकत) विमानतळावर येतील आणि गुरुवारी अर्ज भरण्यासाठी जातील, असे सांगतानाच चंडी म्हणाले की, अचानक त्यांच्या कार्यक्रमात बदल झाला तरी ते गुरुवारी सकाळी अर्ज भरण्यासाठी येथे येतील, असे ठरले आहे. अर्ज भरण्याआधी त्यांचा रोड शो होणार आहे.
राहुल गांधी येथून निवडणूक लढवणार असल्याच्या वृत्तामुळे केवळ वायनाडमध्येच नव्हे, तर संपूर्ण केरळमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रथमच एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष केरळमधून निवडणूक लढवत आहे. त्याचा फायदा आम्हाला संपूर्ण राज्यात तसेच दक्षिणेकडील अन्य राज्यांमध्ये होईल. पंतप्रधान मोदी यांनी दक्षिणेकडील राज्यांबाबत कायमच दुजाभाव केला. त्या राज्यांना कधीच महत्त्व दिले नाही. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये एकाकीपणाची भावना आहे. ही एकाकीपणाची भावना व अन्याय दूर करण्यासाठीच आपण केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, असे राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
बहुसंख्यांकांच्या (हिंदू) मतदारसंघात निवडून येण्याची खात्री नसल्यानेच राहुल गांधी यांनी जिथे अल्पसंख्यांकांची (मुस्लीम) मते अधिक आहेत, अशा मतदारसंघात जाण्याचा निर्णय घेतला, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली होती. त्याला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, आपण मोदींप्रमाणे अल्पसंख्याक व बहुसंख्यांक असा भेद करीत नाही. या देशात हिंदू तरुणही मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. त्याबद्दल वा देशाला भेडसावणाऱ्या मुद्द्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला तयार नाहीत. या विषयांवर पत्रकार परिषदेत प्रश्नांना उत्तरे देण्याची हिंमत मोदी यांनी आधी दाखवावी.
प्रियांकाही सोबत जाणार
वायनाड येथे अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी याही जाणार आहेत. तशी माहिती काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने दिली. मात्र त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.