नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दोन मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. उत्तर प्रदेशातील पारंपरिक असलेला अमेठी आणि केरळातील वायनाड या दोन मतदार संघातून राहुल गांधी आपले नशीब आजमावणार आहेत.
राहुल गांधी आज अमेठी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्याआधी वायनाडप्रमाणेचअमेठीत राहुल गांधी रोड शो करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी उपस्थित राहणार आहेत. रोड शो सकाळी 10 वाजता मुंशागंजपासून सुरु होणार आहे. तर दुपारी 12.30 वाजता राहुल गांधी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अर्ज भरणार आहेत.
दरम्यान, राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्यापासून हा मतदारसंघ देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या 4 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासमवेत येथील केलेल्या रोडशोला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. यावेळी रोड शोमध्ये केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्नितेला हेही होते. या रोड शोमध्ये काँग्रेस कार्यकर्ते व सामान्य नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली. राहुल व प्रियांका गांधी जनतेला अभिवादन करत होते. राहुल गांधी यांनी रोड शोमध्ये सामील झालेल्या अनेकांशी हस्तांदोलन केले.
डाव्यांवर टीका नाहीवायनाडमधून राहुल गांधींच्या उमेदवारीमुळे डावे पक्ष संतापले असून, त्यांनी राहुल यांच्यावर टीका केली आहे. त्याबाबत विचारता राहुल म्हणाले की, त्यांनी माझ्याविरुद्ध प्रचार केला वा टीका केली तरी आपण मात्र डाव्या पक्षांवर अजिबात टीका करणार नाही.
ही तर 'पप्पू स्ट्राइक'; डाव्यांचा राहुल गांधींना टोलाराहुल गांधीच्या उमेदवारीवरून संतापलेल्या डाव्यांनी त्यांना पराभूत करण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्षांचा वायनाड येथून लढण्याचा निर्णय म्हणजे काँग्रेसने डाव्या पक्षांविरोधात पुकारलेली लढाई असल्याची टीका सीपीएम केली आहे. तसेच, सीपीएमच्या मुखपत्राने राहुल गांधींचा उल्लेख 'पप्पू' असा केला आहे. देशाभिमानी या सीपीएमच्या मुखपत्राने राहुल गांधींचा वायनाड येथून लढण्याचा निर्णय म्हणजे 'पप्पू स्ट्राइक' असल्याचे म्हटले आहे.