लोकसभेसाठी बसपाशी आघाडी होईलच, राहुल गांधींना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 06:25 AM2018-10-06T06:25:21+5:302018-10-06T06:26:12+5:30
राहुल गांधी यांना विश्वास; दोन राज्यांत आघाडी न झाल्याचा परिणाम नाही
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : मध्यप्रदेश व राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांत काँग्रेसशी आघाडी करण्यास बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी नकार दिला असला, तरी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस व बसपा यांच्यात निश्चितच समझोता होईल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
एका परिषदेत राहुल गांधी यांना मायावती यांच्या विधानाविषयी प्रश्न करण्यात आला. ते म्हणाले की, मायावती यांच्या पक्षाने मध्यप्रदेश व राजस्थान या दोन राज्यांमध्ये काँग्रेसशी आघाडी केली नाही, तरी आम्हाला फारसा फरक पडणार नाही. तिथे आम्हाला स्वबळावरच बहुमत मिळेल. राज्यातील आघाडी व केंद्रातील आघाडी यात फरक असल्याचे मायावती यांनी सूचित केल्याचा उल्लेखही राहुल गांधी यांनी यावेळी केला. मध्यप्रदेश व राजस्थानात आघाडी होण्यात काँग्रेसचे काही नेते अडथळे आणत असल्याचा मायावती यांचा आरोप आहे. त्याविषयी राहुल गांधी म्हणाले की, जागावाटपाबाबत आमची नेहमीच चर्चेची तयारी आहे. पुढील वर्षीच्या निवडणुकांनंतर तुमच्या आघाडीला बहुमत मिळाल्यास तुम्ही पंतप्रधान होणार का, असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावर राहुल गांधी यांनी अतिशय चतुराईने ‘अन्य पक्षांची तयारी असेल, तर मी पंतप्रधान होईनही’ असे उत्तर दिले.
सरकार आल्यास याला प्राधान्य
राहुल गांधी सतत मोदी सरकारवर टीका करतात; पण प्रत्यक्ष सरकार आल्यास काय करणार, हे सांगत नाहीत, अशी टीका त्यांच्यावर अनेकदा होत असते; पण आजच्या कार्यक्रमात त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि लघु व मध्यम उद्योगांना मजबूत करणे यावर आम्ही निश्चितच लक्ष केंद्रित करू, असे स्पष्टपणे सांगितले.
सध्याचे पंतप्रधान स्वत:चे म्हणणे इतरांवर व जनतेवर लादतात. आम्ही तसे न करता जनतेचे म्हणणे ऐकून घेऊ आणि त्यानुसार निर्णय घेऊ , असे ते म्हणाले.