आदेश रावल
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीचे माजी खा. संदीप दीक्षित यांचे घर भाड्याने घेतले आहे. बी-२ निजामुद्दीन, हा राहुल गांधी यांचा नवीन पत्ता आहे. यापूर्वी या घरात दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित राहत होत्या. शीला दीक्षित यांच्या निधनानंतर संदीप दीक्षित या घरात राहत आहेत.
संदीप दीक्षित हे त्यांचे घर भाड्याने देऊ इच्छित होते आणि राहुल गांधी यांच्यासाठी घराचा शोध सुरू होता. ही बाब एका ज्येष्ठ नेत्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी गांधी कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. ही माहिती मिळताच ज्येष्ठ नेत्या प्रियांका गांधी घर पाहण्यासाठी गेल्या. त्यांच्यानंतर राहुल गांधी यांनीही घर पाहिले. मोदी आडनावाबाबत टिपणी केल्याच्या प्रकरणात सुरतच्या कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी सरकारी निवासस्थान रिकामे केले होते.
...तर मी घर घेणार नाहीसुरुवातीला संदीप दीक्षित यांनी सांगितले की, मी रमा धवन या मावशीच्या घरी स्थलांतरित होत आहे. तुम्ही या घरात राहू शकता. परंतु, राहुल गांधी म्हणाले की, भाडे कराराशिवाय मी घर घेऊ शकत नाही. आता भाडेकरार तयार केला जात आहे. संदीप दीक्षित यांनी घर रिकामे केले आहे.
मोदी आडनावाची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावलेल्या दोन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला स्थगिती देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला होता. या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आल्यास कोणताही आदेश देण्यापूर्वी माझेही म्हणणे ऐकून घ्यावे अशी विनंती करणारे कॅव्हेट भाजपचे आमदार पुर्णेश मोदी यांनी दाखल केले आहे. कारावासाच्या शिक्षेला स्थगिती द्यावी अशी विनंती करणारी राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने ७ जुलैला फेटाळली होती. त्याच दिवशी पुर्णेश मोदी यांनी कॅव्हेट दाखल केले होते.