रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 06:13 AM2024-05-05T06:13:45+5:302024-05-05T06:13:58+5:30
आदिवासीबहुल छोटा उदयपूर जिल्ह्यातील बोडेली शहरात एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना शाह बोलत होते.
बोदेली (गुजरात) : वायनाड व रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी खोचक टीका केली. अमेठीत हरल्याने ते वायनाडला गेले. आता तेथे पराभव दिसू लागल्याने त्यांनी रायबरेली गाठली. मात्र, रायबरेलीतही ते मोठ्या फरकाने पराभूत होतील, असे शाह म्हणाले.
आदिवासीबहुल छोटा उदयपूर जिल्ह्यातील बोडेली शहरात एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना शाह बोलत होते. ते म्हणाले अमेठीतून निवडणूक हरल्यावर ते वायनाडला गेले. आता वायनाडमधून हरणार असल्याचे लक्षात आल्याने ते आता रायबरेलीतून निवडणूक लढवत आहेत. समस्या तुमची आहे, जागेची नाही. तुम्ही रायबरेलीतही मोठ्या फरकाने निवडणूक हराल. तुम्ही पळून गेलात, तरी लोक तुम्हाला हुडकून काढतील, असे अमित शाह म्हणाले.
भाजप सत्तेत असेपर्यंत आरक्षणाला धक्का नाही
नरेंद्र मोदींना आणखी एक कार्यकाळ मिळाला, तर ते आरक्षण रद्द करतील, असा खोटा प्रचार राहुल व त्यांचा कंपू करत आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये मोदींना पूर्ण बहुमत मिळाले होते. परंतु, त्यांनी कधीही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला हात लावला नाही. जोपर्यंत भाजप सत्तेत आहे, तोपर्यंत आरक्षणाला कोणीही हात लावू शकणार नाही, असे शाह म्हणाले.