अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यावर दोन दिवसांनंतर म्हणजेच बुधवारपासून (20 डिसेंबर ) काँग्रेस पार्टीमध्ये आत्मचिंतनाच्या बैठकी सुरू झाल्या आहेत. गुजरात निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करण्यासाठी काँग्रेसनं तीन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन केले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीदेखील शुक्रवारी या शिबिरामध्ये सहभागी होणार आहेत. गुजरातमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भरत सिंह सोलंकी यांनी सांगितले की, ''चिंतन शिबिरात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते जिल्हानिहाय निकालांचं विश्लेषण करणार आहेत तसंच 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी रणनीतीदेखील आखणार आहेत.''
सोमवारी (18 डिसेंबर) गुजरात निवडणुकीचा निकाल लागला. मोदींनी गुजरात जिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरले आहेत. गुजरातमध्ये भाजपाला १८२ पैकी जेमतेम ९९ जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती. शिवाय, काँग्रेस पक्षाच्या गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक 16 जागा मिळवल्या आहेत.
भाजपाला सलग सहाव्यांदा निवडणूक जिंकण्यात यश आलेले आहे, मात्र 2012मध्ये भाजपानं 115 जागा जिंकल्या होत्या, तर यंदा संख्येत घट होऊन 99 जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे. काँग्रेसनं ग्रामीण भागात चांगली कामगिरी बजावली आहे, मात्र शहरी भागांमध्ये काँग्रेसचं फारसा प्रभाव दिसून आला नाही.
पहिले दोन दिवस मेहसाणा जिल्ह्यातील एका रेसॉर्टमध्ये काँग्रेसचं चिंतन शिबिर होणार असल्याची माहिती सोलंकी यांनी दिली आहे. तर तिस-या दिवशी अहमदाबाद तिस-या दिवसाचं आयोजन करण्यात आले आहे. तिस-या दिवशी राहुल गांधीदेखील चिंतन शिबिरात सहभागी होणार आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांना संबोधितदेखील करणार आहेत.
दरम्यान, भाजपाला गुजरातमधील जनतेने जबरदस्त झटका दिला असून, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी मोदी यांना लक्ष्य केले. संसद भवन परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, तीन-चार महिन्यांपूर्वी आम्ही जेव्हा गुजरातमध्ये गेलो होतो, तेव्हा भाजपाशी लढणे काँग्रेसला शक्यच होणार नाही, असे आम्हाला सांगण्यात येत होते, पण तीन-चार महिन्यांत आम्ही ठोस काम केले. केवळ मीच नाही, तर अखिल भारतीय काँगेस समितीची टीम आणि गुजरातमधील पक्ष कार्यकर्ते व जनतेनेही ठोस काम केले. त्याचे परिणाम निकालांमधून सर्वांच्या समोर आले आहेत. भाजपाला व मोदी यांना आपल्याच राज्यात जबरदस्त झटका लागला आहे. आमच्यासाठी हे चांगले निकाल आहेत. आम्ही हरलो, हे आम्हाला मान्य आहे, पण जर आणखी थोडे प्रयत्न केले असते, तर जिंकलो असतो. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील लोकांचे मी आभार मानतो.