नवी दिल्ली : देशात पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुका राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्ष जिंकेल असा विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी व्यक्त केला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीतील निकालांनी पक्ष कार्यकर्त्यांत आपण भाजपला पराभूत करू शकू असा विश्वास निर्माण केला आहे.ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील निवडणूक निकाल काँग्रेससाठी मनोधैर्य वाढवणारा विजय आहे.मोदी यांनी अनेक सभांत भाषणे केली. पाकला मधे आणण्यापासून अनेक खेळ करून पाहिले. परंतु, मोदी मते आपल्या बाजुला वळवू शकले नाहीत, असे पटेल वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य केवळ गुजरातेतच नाही तर संपूर्ण भारतात उंचावले आहे. भाजपला पराभूत केले जाऊ शकते असा विश्वास त्यांना मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी २०१९ मधील निवडणुकीत काँग्रेस पक्षाला निश्चितपणे मदत होणार आहे. राहुल गांधी यांनी गुजरातेत केलेला प्रचार, केलेले कष्ट आणि त्यांनी आकर्षित केलेली गर्दी ही खूपच प्रोत्साहक होती आणि आम्ही ज्या जागा जिंकल्या त्यासाठी मदत देणारी ठरली. १८२ जागांच्या विधानसभेत भाजपने ९९ जागा जिंकल्या. मावळत्या विधानसभेत त्याच्या ११५ जागा होत्या.भाजपने ‘काही खेळ’ केले नसते तर त्याचा गुजरातेत पराभव झाला असता, असा दावा पटेल यांनी केला. काँग्रेसच्या कामगिरीत सतत सुधारणा होत असून यावर्षी होणाºया विधानसभा निवडणुकांत त्याने चांगली कामगिरी केलेली असेल, असे ते म्हणाले. तरूण आणि प्रेरक शक्ती असलेले राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष २०१९ च्या निवडणुकीत विजयी होईल, असेही ते म्हणाले.
राहुल गांधींमुळे पक्ष ‘लोकसभा’ जिंकेल , ज्येष्ठ नेते अहमत पटेल यांना विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 1:03 AM