नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,30,60,542 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,31,968 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 780 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,67,642 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. तर दुसरीकडे कोरोना लसींचा (Corona Vaccine) साठा नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहिलं आहे.
कोरोना लसींची निर्यात थांबवा असं राहुल यांनी मोदींना म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "वाढत्या कोरोना संकटात लसींची कमतरता एक अतिगंभीर समस्या आहे, 'उत्सव' नाही. आपल्या देशवासियांना संकटात टाकून लसींची निर्यात योग्य आहे का? केंद्र सरकारने पक्षपातीपणा न करता सर्व राज्यांना मदत करावी. आपल्या सर्वांना मिळून या महामारीला हरवायचं आहे" असं राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
"आवश्यकता असलेल्या प्रत्येकाला लसीकरण झाले पाहिजे आणि तत्काळ लसींच्या निर्यातीवर बंदी आणली गेली पाहिजे. तसेच लसी जलगतीने उपलब्ध व्हायला हव्यात. देश या क्षणी महामारीच्या दुसऱ्या लाटेशी लढत आहे. आपल्या शास्त्रज्ञ व डॉक्टरांनी मिळून देशातील कोरोनाचं संकट नष्ट करण्यासाठी मोठ्या कष्टाने लस तयार केली. मात्र सरकारने लसीकरण कार्यक्रमाची योग्यप्रकारे अंमलबजावणी केली नाही. देशात एवढ्या हळूवारपणे लसीकरण सुरू आहे की, 75 टक्के लोकांना लस देण्यासाठी वर्षांचा कालावधी लागेल" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात येत असताना कोरोना लसीकरणाचा वेग देखील वाढवण्यात आला आहे. मात्र कोरोनावरील लस सर्व वयोगटातील नागरिकांना सध्या तरी दिली जाऊ शकत नाही असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कोरोना लसीकरणावरून त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. "प्रत्येक भारतीयाला सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे" असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. "गरज आणि मागणी यावर वाद घालणं हास्यास्पद आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे" असं राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.