आदेश रावल लोकमत न्यूज नेटवर्क रायपूर : ‘भारत जोडो’ यात्रेनंतर काँग्रेस आता देशाच्या पूर्व भागातून पश्चिम भागात यात्रा काढण्याच्या विचारात आहे. रायपूर अधिवेशनाच्या तिसऱ्या व शेवटच्या दिवशी पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, आता अरुणाचल ते गुजरात यात्रा काढण्याचा विचार आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षांना आराखडा तयार करण्याचे सुचविले. दरम्यान, शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांनी चीनच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर थेट हल्ला चढविला.
गौतम अदानींवरही निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, अडाणी हे ईस्ट इंडिया कंपनीसारखे देशाला लुटत आहेत. आम्ही पंतप्रधानांना विचारले, तुमचा अदानींशी संबंध काय? त्यानंतर मोदी सरकारने अदानींना संरक्षण देणे सुरु केले.
हुकूमशाहीविरुद्ध जनतेला लढा द्यावा लागेल : खरगे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार लोकशाही मूल्यांविरुद्ध आहे. लोकशाही वाचवण्यासाठी लोकांना या हुकूमशाहीविरुद्ध जोरदार लढा द्यावा लागेल. सरकार जनतेसाठी काम करत नाही. फक्त हुकूमशाही चालवत आहे. गरीब, अनुसूचित जमाती-जाती आणि महिलांशी संबंधित मुद्दे आम्हाला संसदेत मांडता येत नाहीत. २००४ पूर्वी अदानींची संपत्ती ३,००० कोटी होती. जी २०१४ मध्ये वाढून ५०,००० कोटी रुपये झाली. - मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस
छत्तीसगडमधील आमच्या नेत्यांवर ईडी व आयकरचे छापे पडत आहेत. सरकार फक्त ‘उद्योगपती मित्रांचा’ आवाज ऐकत आहे. माध्यमे व न्यायव्यवस्था यांना दाबले जात आहे. संसदेत विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात आहे. - प्रियांका गांधी, सरचिटणीस, काँग्रेस
भाजप व आरएसएसचे लोक सत्तेसाठी हपापलेले आहेत. आमचे परराष्ट्र मंत्री म्हणतात की, चीनची अर्थव्यवस्था आमच्यापेक्षा खूप मजबूत आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी लढू शकत नाही. हा कसला राष्ट्रवाद? - राहुल गांधी, काँग्रेस नेते