काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील ११ राज्यांतून भारत जोडो यात्रा पूर्ण करण्याचा संकल्प केला असून आजमित्तीस ते कर्नाटकात यात्रा करत आहेत. कर्नाटकच्या रायचूरमधील येरागेरा गावातून आज पुन्हा त्यांची भारत जोडो यात्रा सुरु झाली असून आज कर्नाटकातील त्यांच्या यात्रेचं शेवटचं पाऊल असणार आहे. त्यानंतर, उद्या म्हणजे २३ ऑक्टोबर रोजी ही यात्रा तेलंगणात पहिलं पाऊल ठेवेल आणि लवकरच महाराष्ट्रातूनही या यात्रेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या यात्रेला लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून दक्षिण भारतातही राहुल गांधींचं ठिकठिकाणी स्वागत झाल्याचं पाहायला मिळालं.
केंद्रातील मोदी सरकारविरोधात देशातील सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करत राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे. ही यात्रा दिवाळीनंतर महाराष्ट्रात येणार आहे. या 'भारत जोडो यात्रे'त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी त्यांची भेट घेऊन निमंत्रण दिले होते, त्यांनी काँग्रेसचे हे निमंत्रण स्वीकारले आहे.
कन्याकुमारी ते काश्मीर अशा एकूण ३५७० किमीचा प्रवास करणारी ही भारत जोडो यात्रा आहे. ७ सप्टेंबर रोजी राहुल गांधींनी या यात्रेला सुरुवात केली असून आत्तापर्यंत त्यांनी १२१५ किमीचा प्रवास पूर्ण केला आहे. कर्नाटकात आज यात्रेचं शेटवटचं पाऊल असून यापूर्वी तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यातून राहुल गांधींनी पायी प्रवास केला आहे. आता, तेलंगणात त्यांची एन्ट्री होणार असून त्यानंतर महाराष्ट्रात यात्रेचं पाऊल पडणार आहे. यात्रेचा आज ४५ वा दिवस आहे.
तेलंगणातून या यात्रेचं महाराष्ट्रात आगमन होणार आहे. महाराष्ट्रात राहुल गांधींच्या स्वागतासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार हजर असणार आहेत. राहुल गांधींसमेवत ते व्यासपीठावरही दिसून येतील. आंध्र प्रदेशात राहुल गांधींना कामगार आणि शेतकरी वर्गाचा चांगला पाठिंबा मिळाल्याचं दिसून आलं.
लवकरच महाराष्ट्रात
राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रात साधारणतः सहा नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. या यात्रेचा राज्यातील प्रवास नांदेड जिल्ह्यातील देलगूर तालुक्यातून होणार असल्याचे माजी मंत्री तथा कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.