हैदराबाद : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुला आत्महत्याप्रकरणी अधिक आक्रमक पवित्रा घेत शनिवारी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसह एकदिवसीय उपोषण केले. त्यांच्या या उपोषणाने देशातील राजकारण ढवळून निघाले. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस पक्षात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. हैदराबाद विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू असलेल्या ठिकाणी राहुल गांधी शुक्रवारी मध्यरात्री येथे धडकले आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत जवळपास दोन तास घालवले. एवढेच नाही तर रोहितच्या जन्मदिनानिमित्त काढण्यात आलेल्या कँडल मार्चमध्येही ते सहभागी झाले. ३० जानेवारी हा रोहितचा जन्मदिवस असून तो आज आपल्यात असता तर त्याने वयाची २७ वर्षे पूर्ण केली असती. आंदोलनस्थळी मृत रोहितची आई राधिका आणि भाऊ राजू हेसुद्धा उपस्थित होते. राहुल गांधी रात्री १२ वाजून १० मिनिटांनी येथे पोहोचले. त्यांनी रोहितच्या फोटोसमोर मेणबत्ती प्रज्वलित केली आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले. (वृत्तसंस्था)भाजप-काँग्रेसमध्ये जुंपलीराहुल यांनी हैदराबादेत उपोषणात सहभाग घेतल्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. काँग्रेसने भाजप व केंद्र सरकारवर निष्क्रियतेचा आरोप केला तर दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे राजकारण करणारी काँग्रेस नक्राश्रू ढाळीत असल्याचा दावा भाजपने केला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विद्यापीठ दौऱ्याचा विरोध करून तेलंगणात कॉलेज बंदचे आवाहन केले. तसेच गोंधळ घालण्याच्या प्रयत्न केला.राहुल यांचा संघावर हल्लापंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ उच्च स्तरावरून एक विचार लादून विद्यार्थ्यांची भावना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्याचबरोबर रोहित वेमुला याच्या आत्महत्येची घटना महात्मा गांधी यांच्या हत्येसारखीच असल्याचा दावाही त्यांनी केला. या साऱ्या प्रकारामुळेच माझा मोदी आणि संघ यांना विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधींचा हैदराबादेत आक्रमक पवित्रा; राजकारण ढवळून निघाले
By admin | Published: January 31, 2016 12:34 AM