निलंबनाच्या कारवाईविरोधात राहुल गांधींचे आंदोलन, व्यंकैय्या नायडूंनी दिला स्पष्ट नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 01:07 PM2021-12-02T13:07:10+5:302021-12-02T13:07:30+5:30
राज्यसभेचे सभापती व्यंकैय्या नायडू यांनी पुन्हा एकदा खासदारांवर केलेली निलंबनाची कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली:संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. सत्राच्या सुरुवातीलाच सभागृहात मोठ्या प्रमाणात गदारोळ पाहायला मिळाला. विरोधकांनी आजही राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे. निलंबन मागे घेण्यासाठी विरोधकांनी संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले. या आंदोलनात राहुल गांधीदेखील सहभागी झाले होते.
खासदारांनी माफी मागावी-व्यंकैय्या नायडू
दरम्यान, राज्यसभेचे सभापती व्यंकैय्या नायडू यांनी पुन्हा एकदा खासदारांवर केलेली निलंबनाची कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षाने संसदेचे सत्रात गदारोळ घालू नये, ही निलंबनाची पहिलीच वेळ नसून, याआधी देखील निलंबन करण्यात आले असल्याचे सभापती म्हणाले. तसेच, निलंबित खासदारांनी राज्यसभेत माफी मागावी त्यानंतरच त्यांचे निलंबन मागे घेण्यात येईल असे देखील नायडू म्हणाले.
#WATCH | Congress MP Rahul Gandhi joins the Opposition leaders' protest against the suspension of 12 Opposition members of Rajya Sabha, in Delhi pic.twitter.com/w7Y1gSLTym
— ANI (@ANI) December 2, 2021
विरोधकांच्या आंदोलनात राहुल गांधींचा सहभाग
राज्यसभेच्या 12 सदस्यांना निलंबित केल्यानंतर विरोधी पक्षाने जोरदार आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. त्या आंदोलनात काँग्रेस नेते राहुल गांधी देखील सहभागी झाले होते. यावेळी सर्व नेत्यांनी हाताला काळी पट्टी बांधत निलंबनाच्या कारवाईचा निषेध केला. तसेच माफी मागणार नसल्याचे ठामपणे सांगितले.
विरोधकांचा सभात्याग
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपसभापती हरिवंश यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली. परवानगी न मिळाल्याने काँग्रेस खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, आरजेडी, टीआरएस आणि आययूएमएलनेही राज्यसभेतून सभात्याग केला.
पावसाळी अधिवेशनातील कृत्यामुळे निलंबन
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेच्या 12 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी(11 ऑगस्ट) केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबन झालेल्या खासदारांमध्ये एल्माराम करीम (माकप), फुल्लो देवी नेताम (काँग्रेस), छाया वर्मा (काँग्रेस), रिपून बोरा (काँग्रेस), बिनॉय बिस्वाम (सीपीआय), राजमणी पटेल (काँग्रेस), डोला सेन (तृणमूल काँग्रेस), शांत छेत्री (तृणमूल काँग्रेस), सय्यद नासीर हुसेन (काँग्रेस), प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना), अनिल देसाई (शिवसेना) आणि अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस) यांचा समावेश आहे.