नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या माजी खासदार दिव्या स्पंदना उर्फ रम्या यांच्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून रम्या या राहुल यांची सोशल मीडियावरील खात्यांची जबाबदारी सांभाळत आहेत. रम्या यांनी हा कारभार हाती घेतल्यापासून राहुल यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मोदी सरकारच्या कारभारावर अचूक व प्रभावी पद्धतीने निशाणा साधण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकांकडून या बदलाचे स्वागतही करण्यात आले होते. परंतु, आता विरोधकांनी रम्या यांच्या पूर्वीच्या व्यावसायिक संबंधांचे पुरावे समोर आणल्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार रम्या यांचे मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्याशी व्यावसायिक संबंध होते. रम्या या मल्ल्या यांच्या मालकीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या आयपीएल टीमच्या सदिच्छादूत (ब्रँड अॅम्बेसिडर) होत्या. 2010 मधील रम्या यांची हाँगकाँग येथील सहल ही मल्ल्या पुरस्कृत होती. स्वत: रम्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तशी माहिती दिली होती.
2012 साली रम्या यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर किंगफिशर एअरलाईन्सच्या पडत्या काळातही रम्या यांनी मल्ल्या यांची समर्थन करणारी केलेली काही ट्विटस विरोधकांकडून समोर आणण्यात आली आहेत. विजय मल्ल्या हा चांगला व सच्चा माणूस आहे. किंगफिशर या सगळ्यातून लवकरच बाहेर पडेल, अशी आशा रम्या यांनी व्यक्त केली होती.
परंतु गेल्या काही काळात रम्या यांचा सूर पूर्णपणे पालटला. इतके दिवस मल्ल्या यांची स्तुती करणाऱ्या रम्या यांनी ललित मोदी व मल्ल्या फरार झाल्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य करायला सुरूवात केली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावरही त्यांनी गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले होते. राहुल गांधी यांच्या सोशल मीडिया सल्लागार झाल्यापासून त्यांच्या मोदी सरकारविरुद्धच्या टीकेचा सूर आणखीनच तीव्र झाला होता. त्यामुळे आता विरोधकांकडून रम्या यांच्या जुन्या ट्विटसचा दाखला देत काँग्रेसला पेचात पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून अद्यापपर्यंत या टीकेला कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही.