नवी दिल्ली - बारामुल्लामध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बीएसएफचे सबइन्स्पेक्टर राकेश डोवाल शहीद झाले. तसेच तीन नागरिक मृत्यूमुखी पडले असून जवळपास 6 जण जखमी झाले आहेत. त्यानंतर बीएसएफने लगेचच पाकिस्तान्यांना प्रत्यूत्तर दिले असून यामध्ये 7 ते 8 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. यामध्ये स्पेशल सर्व्हिस ग्रुपचे 2-3 कमांडो ठार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. देशात एकीकडे दिवाळीचा आनंद असताना सीमारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. त्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधींनी पाकिस्तानचा चांगलाच समाचार घेतला.
पाकिस्तानकडून सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणावर उखळी तोफांचा मारा सुरु झाला आहे. त्यामध्ये काही घरेही उद्ध्वस्त झाली असून नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाकिस्तानच्या गोळीबारात तीन जवान शहीद झाले असून दोन जवान उरी सेक्टरमध्ये तर एक गुरेझ सेक्टरमध्ये शहीद झाले. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली. या हल्ल्यासंदर्भात वृत्त येताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाकिस्तानवर संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तान हा भित्रा अन् कमजोर असल्याचं सिद्ध झालं, असं राहुल यांनी म्हटलं.
राहुल गांधींनी ट्विट करुन पाकिस्तानविरोधात रोष व्यक्त केला आहे. पाकिस्तान जेव्हाही शस्त्रसंधीचे उल्लंघन करतो, त्यावेळी तो भित्रा आणि कमजोर असल्याचं सिद्ध होतं. सणासुदीलाही आपल्या कुटुंबीयांपासून दूर, भारतीय सैन्याचे जवान देशाच्या सुरक्षेत तैनात आहेत. पाकिस्तानच्या घृणास्पद कटकारस्थानाला उध्वस्त करत आहेत. सैन्यातील प्रत्येक जवानास माझा सलाम... असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. एकीकडे देशात दिवाळीचा आनंद असताना सीमारेषेवर भारतमातेचे सुपत्र आपल्या प्राणाची आहुती देत आहेत.
सीमारेषेवरील या गोळीबारात डोवाल शहीद झाले असून आणखी एक जवान जखमी झाल्याचे म्हटले आहे. एलओसीवर पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरु असून बीएसएफचे जवानही त्यांनी चोख प्रत्यूत्तर देत आहेत. राकेश डोवाल हे बीएशएफच्या युद्धसामुग्रीच्या बॅटरी युनिटमध्ये तैनात होते. दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून झालेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुसरे जखमी कॉनस्टेबल वासू राजा यांना गळा आणि हाताला दुखापत झाली आहे. दोघेही शत्रूला प्रत्यूत्तर देण्याच्या मोहिमेवर तैनात होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या राजा यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
तीन जवान शहीद
जम्मू काश्मीरमध्ये दिवाळीच्या आधी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरु झाली आहे. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये पाच दिवसांपूर्वी सीमारेषेजवळ सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये कॅप्टनसह तीन जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवादी मारले गेले आहेत. शहीदांमध्ये दोन सैन्याचे आणि एक बीएसएफचा जवान आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार कॉन्स्टेबल सुदीप सरकार हे माछिल सेक्टरमध्ये शहीद झाले. दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेमध्ये भारतीय जवान प्राणांची बाजी लावत आहेत. त्यांच्यासोबत बीएसएफचे जवान आहेत. संयुक्त मोहिम सुरु असल्याचे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी रात्रीपासून माछिल सेक्टरमध्ये गस्ती पथकाला संशयस्पद हालचाली दिसल्या. यावेळी दहशतवादी मोठ्या संख्येने घुसखोरीचा प्रयत्न करत होते. या वेळी दहशतवाद्यांवर सैन्याने गोळीबार केला. यात दोन दहशतवादी मारले गेले आहेत. त्यांच्याकडून एक एके 47 रायफल आणि 2 बॅग ताब्यात घेण्यात आल्या आहेत.