लोकसभा निवडणुकी आधी काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. ही यात्रा आज बिहारमध्ये पोहोचली असून रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. न्याय यात्रेत आरजेडीचे नेते माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सहभाग घेतला. यावेळी तेजस्वी यादव यांनी स्वत: ड्रायव्हिंग केली. त्यांच्या बाजूला राहुल गांधी बसले होते. दरम्यान, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडले. यानंतर तेजस्वी यादव बिहारमध्ये आघाडीच्या प्रमुखपदी असल्याचे बोलले जात आहे, आज राहुल गांधी कैमूरच्या दुर्गावती ब्लॉकच्या धनेछा येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची न्याय यात्रा आज दुसऱ्यांदा बिहारमध्ये पोहोचली आहे. या आधी न्याय यात्रा येथे पोहोचली होती त्यावेळी सरकार बदलत होते. आता आलेल्या यात्रेला मुख्यमंत्री नितीश कुमार पूर्णिया रॅलीला जाणार असल्याची चर्चा होती, पण नितीश कुमार यांनी इंडिया आघाडी सोडून एनडीएमध्ये प्रवेश केला.
विरोधी आघाडीतून नितीश कुमार बाहेर पडले नाहीत, तेजस्वी यादव बिहारमध्ये सत्तेबाहेर आहेत. आता बिहारमध्ये तेजस्वी यादव हे इंडिया आघाडीचे नेते आहेत. बिहारमध्ये काँग्रेसने आघाडीत नेहमीच लहान भावाची भूमिका बजावली आहे. अशा स्थितीत आज राहुल गांधींच्या गाडीची ड्रायव्हिंग सीट ताब्यात घेऊन तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये इंडिया आघाडीच्या ड्रायव्हिंग सीटवरही असल्याचे संकेत दिले आहेत.