राहुल गांधींची शेअर मार्केट अन् सोन्यातही मोठी गुंतवणूक; 'या' कंपन्याचे स्टॉक्स खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 03:10 PM2024-04-04T15:10:15+5:302024-04-04T15:18:08+5:30
शेअर मार्केट, गोल्ड बॉण्ड आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचीही माहिती या अर्जात दिली.
नवी दिल्ली - देशभरात लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू असून शेअर मार्केटमध्येही राजकीय वातावरणाचा परिणाम दिसून येतो. अनेक राजकीय नेतेही शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात. मात्र, सध्या राजकीय नेते प्रचार आणि निवडणुकांमध्ये गुंतलेले आहेत. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यातील संपत्ती विवरण पत्रात राहुल गांधींना आपल्या कमाईसह इतरही इतंभू माहिती दिली आहे. शेअर मार्केट, गोल्ड बॉण्ड आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचीही माहिती या अर्जात दिली.
निवडणूक आयोगाकडे राहुल गांधींचा जो अर्ज दाखल झाला. त्यामधील माहितीनुसार, राहुल गांधींकडे २५ शेअर आहेत. या शेअर्समध्ये त्यांनी ४.३० कोटींची गुंतवणूक केली आहे. राहुल गांधींनी टाटा कंपनीसह आयसीआयसीआय बँकेसह इतरही लार्ज कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच, काही स्मॉल कॅप फंडातही पैसे गुंतवले आहेत. टाटा कंपनीचे ४०६८ शेअर्स गांधी यांच्याकडे असून त्याची किंमत १६.६५ लाख रुपये एवढी आहे.
ITC चे ३,०३९ शेअर आणि ICICI बँकेचे शेअर २,२९९ होते, या शेअर्सची मार्केट किंमत १२.९६ लाख रुपये आणि २४.८३ लाख रुपये आहे. त्यांच्या पोर्टफोलियमधील अन्य शेअर्समध्ये, अल्काइल एमाइन्स, एशियन पेंट्स, बजाज फाइनेंस, दीपक नाइट्राइट, डिवीज लैबोरेटरीज, इंफोसिस, टाटा कंसल्टेंसी सर्विसेज (TCS), ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि टायटन कंपन्यांचा सहभाग आहे. त्यांच्या शेअर्स गुंतवणुकीत अदानी आणि अंबानींच्या कंपनीचे कुठलेही स्टॉक नाहीत.
मार्केट व्हॅल्यू टर्मनुसार, पीडिलाइट इंडस्ट्रीज टेबलच्या टॉपवर आहे. त्यानंतर, बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्सचा नंबर लागतो. पीडिलाइटमध्ये राहुल गांधींच्या १४७४ शेअर्सची व्हॅल्यू, १५ मार्चपर्यंत ४३.२७ लाख रुपये एवढी होती. बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्ससाठी ५५१ शेअर्स आणि १,२३१ शेअर्सची व्हॅल्यू क्रमशः ३५.८९ लाख रुपये आणि ३५,२९ लाख रुपये एवढी होती.
राहुल गांधींची गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक
राहुल गांधींचे सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये १५.२७ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. आरबीआयकडून सुरू केलेल्या पीपीएफ अकाऊंटमध्ये ६१.५२ लाख रुपये आणि ४,२० लाख रुपयांचे ३३३.३० ग्रॅम सोनंही आहे. केरळच्या वायनाड येथून राहुल गांधी विद्यमान खासदार आहेत. बुधवारी दुसऱ्यांदा त्यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.