नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या माध्यमांपासून तसेच सक्रीय राजकारणापासून चार हात लांब राहताना पाहायला मिळत आहेत. राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राहुल गांधींचा यंदाचा वाढदिवस लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर आलेला आहे. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है ही घोषणा करत आक्रमकरित्या सत्ताधारी भाजपाच्या विरोधात प्रचार केला. मात्र राहुल गांधींच्या प्रचाराला यश आलं नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अनेक राज्यांमध्ये खातंदेखील उघडलं नाही. स्वत: राहुल गांधी यांनाही अमेठी या पारंपारिक मतदारसंघात पराभव सहन करावा लागला. अमेठी लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या स्मृती इराणी निवडून आल्या तर केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींना विजय मिळाला. देशभरात काँग्रेसचा झालेला पराभव जिव्हारी लागल्याने राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या निर्णयाला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे.
2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीच्याआधी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा राहुल गांधी यांच्या खांद्यावर आली होती. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची विजयी घोडदौड रोखण्यात राहुल गांधींना काही प्रमाणात यश आलं. तर त्यानंतर झालेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत भाजपाला जोरदार टक्कर देतील अशी आशा व्यक्त करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा अनपेक्षित पराभव झाला. भाजपाला मागील लोकसभा निवडणुकीपेक्षाही जास्त जागा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मिळाल्या. इतकचं नाही तर ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे तिथेदेखील भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्याने राहुल गांधी हताश झाले.
राहुल गांधी यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर चर्चा करायची झाल्यास त्यांनी राजकारणात काय कमावलं आणि काय गमावलं हे गणित सोडविणं राजकीय विश्लेषकांनाही जमणार नाही. सध्यातरी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा राहुल गांधी सक्षमपणे पुढे सांभाळतील अशी स्थिती नाही. त्यामुळे अध्यक्षपदावर गांधी घराण्याव्यतिरिक्त नेता असावा असं राहुल गांधी यांना वाटतं. त्यामुळे पुढील राजकारणात राहुल गांधी कितपत यशस्वी होतील हे आगामी काळात कळेल.