ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. बुधवारी जीडीपीची आकडेवारी जाहीर झाली यामध्ये भारताचा जीडीपीचा दर घसरल्याने राहुल गांधींनी मोदींना लक्ष केलं आहे. "आपल्या अपयशांपासून देशाचं लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सरकार इतर मुद्दे निर्माण करतं आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. जीडीपीचा घटलेला दर, वाढती बेजोरगारी या मूलभूत अपयशापासून आपलं लक्ष विचलित करण्यासाठी इतर समस्या तयार केल्या जात आहेत, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत भारताचा जीडीपी घटल्यामुळे भारताने "वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था" हे शिर्षक गमावलं असल्याच्या एका बातमीचा संदर्भ राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये दिला आहे.
"मोठ्या नोटा चलनातून बंद झाल्याने त्याचा परिणाम जीडीपीच्या दरावर झाला आहे. म्हणुनच जीडीपीमध्ये 2 टक्क्यांनी घट झाली आहे, असा अंदाज माजी पंतप्रधान मनमोहम सिंग यांनी व्यक्त केला आहे. माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनीसुद्धा नोटबंदीच्या निर्णयामुळे जीडीपीमध्ये घट झाल्याची टीका केली आहे.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा परिणाम यंदाच्या जीडीपीवर झाला आहे. नोटाबंदीच्या परिणामांमुळे भारताचा विकासदर ७.१ टक्क्यांपर्यंत मंदावला, असा अहवाल केंद्रीय सांख्यिकी विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे. यापूर्वी जानेवारी- मार्च या शेवटच्या तिमाहीमध्ये नोटाबंदीचे नकारात्मक परिणाम दिसून आले होते. त्यामुळे भारताचा जीडीपी ६.१ टक्क्यांपर्यंत सिमीत राहिला होता. गेल्यावर्षी चांगला पाऊस पडल्याने कृषी क्षेत्रात चांगली वाढ दिसून आली होती. मात्र, 9 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यामुळे या सगळ्यावर पाणी फेरले गेल्यासारखी स्थिती आहे, असे सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. घटलेल्या जीडीपीमुळे भारताने "वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था" हे शिर्षक गमावलं आहे. भारताचा जीडीपी आता चीनच्या जीडीपीपेक्षा कमी झाला आहे. जानेवारी-मार्च या तीन महिन्यात चीनचा जीडीपी 6.9 टक्के इतका आहे. याआधी 2015-16 आणि 2016-17 या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी दर अनुक्रमे 8.3 टक्के आणि 7.6 टक्के इतका होता.
केंद्रीय सांख्यिकी विभागातर्फे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या जीडीपीच्या आकड्यांमुळे मोदी सरकारने लोकांचा अपेक्षा भंग केल्याचं बोललं जातं आहे.
Falling #GDP.Rising #unemployment.Every other issue is manufactured to distract us from this fundamental failurehttps://t.co/Hoq1UF6Uou— Office of RG (@OfficeOfRG) June 1, 2017