नवी दिल्ली- काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मध्यरात्री कठुआ-उन्नाव बलात्कार घटनांच्या निषेधार्थ इंडिया गेटजवळ कँडल मार्च काढला. राहुल गांधींच्या या कँडल मार्चमध्ये अशोक गेहलोत, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद आणि दिग्विजय सिंह, अंबिका सोनी, गुलाम नबी आझाद, नफीसा सोनी सारखे काँग्रेसचे दिग्गज नेतेही सहभागी झालेत. मानसिंग रोडपासून इंडिया गेटपर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला. तसेच प्रियंका गांधी वढेरा यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते राहुल गांधींच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरले. निर्भयाचे आईवडीलही या मोर्चात सहभागी झालेत. मध्यरात्री काढलेल्या या मार्चमध्ये काही कार्यकर्त्यांमध्ये अचानक गोंधळ उडाला आणि प्रियांका गांधींसह महिलांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटनाही घडली. काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र काही जण सेल्फी काढण्यात मग्न असल्याचेही दिसून आले. निर्भया बलात्काराच्या घटनेनंतर पहिल्यांदाच दिल्लीत एवढ्या मोठ्या प्रमाणात कँडल मार्च निघाल्याचे दिसून आले.महिलांवर होणारे अत्याचार हा राजकीय विषय नसून राष्ट्रीय विषय झालाय. रस्त्यावर उतरलेल्या जनक्षोभाकडे पाहून तुम्हाला हे समजलंच असेल. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे. महिला अत्याचाराविरोधात सरकारनं कडक पावलं उचलावीत, अशी आमची अपेक्षा असल्याचं राहुल गांधी यांनी कँडल मार्चवेळी सांगितले.कँडल मार्चसंदर्भातील अपडेट्स- राहुल गांधी कँडल मार्चच्या ठिकाणावरून गेल्यानंतर गर्दी ओसरली- राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कँडल मार्चच्या ठिकाणावरून पुन्हा निवासस्थानाकडे परतले- प्रियंका गांधी आणि महिलांना काँग्रेस कार्यकर्त्यांची धक्काबुक्की- पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना थांबवल्यानंतर ते जमिनीवर बसले- नफिसा अली, अंबिका सोनी, शोभा ओझा यांच्यासह शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते मोर्च्यात सहभागी झालेत. - राहुल गांधींनी हा कार्यक्रम तयार केला, प्रियंका गांधीही या मोर्चात सहभागी- इंडिया गेटवरच्या कँडल मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश - काँग्रेसच्या ऑफिसमधून कँडल मार्चला सुरुवातझोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी आम्ही हा कँडल मार्च काढला. पंतप्रधान बेटी पढाओ, बेटी बचावच्या घोषणा देत असतात. परंतु त्यांच्याच राज्यात मुलींवर अत्याचार होत आहेत. आरोपींना वाचवणा-या त्यांच्या मंत्र्यांविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतीही कारवाई करत नाही, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला. राहुल गांधींनी या कँडल मार्चसंदर्भात गेल्या काही वेळापूर्वी ट्विटरद्वारे माहिती दिली होती. ते म्हणाले होते. उन्नाव-कठुआ बलात्कार प्रकरणामुळे इतरांप्रमाणे मलाही अतीव दुःख झाले. महिलांशी अशा प्रकारचं गैरवर्तन सहन केलं जाणार नाही. या बलात्काराच्या निषेधार्थ मी इंडिया गेटवर कँडल मार्च काढणार आहे. तुम्हीही माझ्यासोबत सहभागी व्हा, असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं होतं. उन्नाव-कठुआ बलात्कारप्रकरणी राहुल गांधींनी नरेंद्र मोदींनाही लक्ष केलं होतं. तसेच या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकारात कोणी दोषी व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न कसा काय करू शकतो?, अशा प्रश्न विचारत मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं. अशा विकृत लोकांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी, असंही म्हणत राहुल गांधींनी या प्रकरणाचा निषेध नोंदवला होता. तुम्हीही माझ्यासोबत सहभागी व्हा राहुल गांधींच्या या आवाहनाला दिल्लीतील जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. हजारो तरुण-तरुणी या मार्चमध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतील काँग्रेस कार्यकर्तेही इंडिया गेटवर यावेळी उपस्थित होते.