नवी दिल्ली - एकीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत असताना राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. गुजरातच्या विकासाच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना टार्गेट केलं आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचार संपेपर्यंत भाजपाने घोषणापत्र जारी का केलं नाही ? असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे. अद्यापही ‘भाषण ही शासन’ आहे का ? असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला आहे.
'गुजरातमध्ये गेल्या 22 वर्षांपासून भाजपा सरकार आहे. मला फक्त इतकं विचारायचं आहे की, काय कारण आहे जे पंतप्रधान मोदींच्या भाषणातून विकास गायब आहे ? मी गुजरातच्या रिपोर्ट कार्डमधून 10 प्रश्न विचारले होते, पण त्यांचंही उत्तर नाही. पहिल्या टप्प्यातील प्रचार संपेपर्यंत घोषणापत्रही नाही. मग आता भाषण हेच शासन आहे का ?', असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे.
याआधी केलेल्या ट्विटमध्ये राहुल गांधींनी मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केलं होतं. 'मतदारांचा सहभाग लोकशाहीचा आत्मा असतो. गुजरात निवडणुकीत प्रथमच मतदान करत असलेल्या माझ्या तरुण सहका-यांचं स्वागत आणि अभिनंदन. गुजरातच्या जनतेला आवाहन आहे की मोठ्या प्रमाणात मतदान करुन लोकशाहीला यशस्वी करा', असं राहुल गांधींनी म्हटलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत लोकांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जनतेला आवाहन करताना सांगितलं की, 'आज गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील मतदान आहे. मी सर्व मतदारांना लोकशाहीच्या या सणात सहभागी होण्याचं आणि मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन करतो'.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी मतदान होत आहे. तर 89 जागांसाठी तब्बल 977 उमेदवार रिंगणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. मतदान सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झालं असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 89 जागा असून त्यांतील 53 जागा या ग्रामीण भागातील आहेत तर 36 जागा या शहरी भागातील आहे. सध्या ग्रामीण भागातील 53 जागांपैकी भाजपकडे 32 आणि काँग्रेसकडे 17 जागा आहेत. तर शहरी भागातील 36 जागांपैकी भाजपकडे तब्बल 31 आणि काँग्रेसकडे फक्त 5 जागा आहेत.
गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत.