नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’च्या धर्तीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शुक्रवारी ‘दिल की बात’ केली. यात त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आणि हे सांगण्याचा प्रयत्न केला की, चीनने भारताविरुद्ध मोर्चा उघडण्यासाठी हीच वेळ का निवडली?
राहुल गांधी यांनी विदेश धोरण, आर्थिक धोरणासाठी मोदी सरकारला जबाबदार ठरविले. अमेरिकेसोबतच्या भारताच्या संबंधाला ते राजनैतिक भागीदारी मानतात. रशिया आणि युरोपीय देशांसोबतच्या भारताच्या संबंधांचा उल्लेख करून ते सहयोगी असल्याचे सांगितले; पण अमेरिकेसोबतचे संबंध हे देण्या-घेण्यावर आधारित असल्याचे सांगत स्पष्ट केले की, याला वास्तविक सहकार्याचे संबंध समजणे मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाची चूक ठरेल. नेपाळ, भूतान, श्रीलंका हे भारताचे मित्र होते. ते आज कुठे आहेत? राहुल गांधी यांचा थेट आरोप होता की, मोदी सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे या देशांशी संबंध बिघडले आहेत.
देशाच्या बिघडलेल्या अर्थव्यवस्थेसाठी त्यांनी मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. ते म्हणाले की, ५० वर्षांत भारताने ज्या प्रकारे आपला आर्थिक कणा मजबूत केला आहे, तो मोदी यांनी एका झटक्यात तोडला आहे. बेरोजगारी वाढली आहे. लघु उद्योग बंद होत आहेत. महागाई वाढली आहे. परिणामी, लोकांचा विश्वास संपला आहे. याचा फायदा चीनने उठविला आहे. आर्थिक संकट, चुकीचे परराष्ट्र धोरण, शेजाऱ्यांशी बिघडलेले संबंध यामुळेच चीनने ही वेळ निवडून भारताविरुद्ध मोर्चा उघडला आहे.